बिबट्या भुकेला.. वासराचा पाडला फडशा; गाय बेशुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:38 AM2020-12-15T04:38:23+5:302020-12-15T04:38:23+5:30
नरभक्षक बिबट्याने तालुक्यात तीन माणसांचे जीव घेतले आहेत. माणसाच्या रक्ताला चटाविलेल्या बिबट्याला मात्र ७ डिसेंबरपासून माणसावर हल्ला करणे शक्य ...
नरभक्षक बिबट्याने तालुक्यात तीन माणसांचे जीव घेतले आहेत. माणसाच्या रक्ताला चटाविलेल्या बिबट्याला मात्र ७ डिसेंबरपासून माणसावर हल्ला करणे शक्य न झाल्याने त्याने वांगी (भिवरवाडी) भागातील गाय व वासरावर हल्ला करून आपली भूक भागविली. चिखलठाण व बिटरगाव (वांगी) या दोन ठिकाणी येऊनही शार्पशूटरचा नेम चुकल्याने तो मोकाट सुटला आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्याचे सांगवी, बिटरगाव व भिवरवाडी परिसरात त्याचे वास्तव्य आहे. सांगवीतील महिलेवर हल्ला केल्यानंतर तो बिटरगाव शिवारात विठ्ठल रोडगे यांच्या शेतात दिसला. तीन शार्पशुटरच्या मदतीला आता आणखी एक बारामतीहून खासगी शार्पशुटरला पाचारण केल्याचे वनविभाकडून स्पष्ट करण्यात आले.
सोमवारी (दि.१४) पहाटे भिवरवाडी येथील गोरख आरकिले यांच्या वस्तीवर बिबट्याने गाय व वासरावर हल्ला केला. यामध्ये या दोन्ही प्राण्यांच्या नरड्याच्या भागावर चावा घेऊन प्रथम त्यांना मारण्याचा प्रयत्न केला व नंतर लहान वासराचा फडशा पाडला. माणसाच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने सात-आठ दिवसांत माणसाची शिकार न मिळाल्याने शेतातील गोठ्यात असलेल्या जनावरावर हल्ला करून ठार मारल्याने दहशतीच्या सावटाखाली आहेत. रविवारी ढोकरी हद्दीतील भानुदास सलगर यांच्या शेतात बिबट्या खात्रीने आहे, असे लोक सांगत असतानाही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे.
-----
वनविभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप
सोमवारी पहाटे कुत्रे मोठ्याने भुंकत होती. त्याच सुमारास गाय गोठ्यात धडपड असल्याचा आवाजही आला. मात्र भीतीने आम्ही बाहेर आलो नाही. आम्हाला बिबट्या असल्याची शंका आली होती. त्यादरम्यान वनविभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झाला नाही. वनविभागाला बिबट्याचे काही गांभीर्य दिसत नाही, असा आरोप भिवरवाडीचे रहिवासी अनिल आरकिले यांनी केला आहे.
---------
बिबट्या पसार होतोच कसा?
बिबट्याकडून आणखी एक जीवघेणा हल्ला होण्याची वाट वनविभाग पाहत आहे काय? असा सवाल अंगद देवकते यांनी केला आहे. उजनी भागासह जनावरे दावणीला, शेतीला पाणी देणे, ऊसतोड, तूर काढणी शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईस जबाबदार कोण? शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सारी यंत्रणा कामाला असताना बिबट्या तब्बल चारवेळा कसा पसार होतो? असा प्रश्न देवकते यांनी केला.