माळशिरस तालुक्यात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2022 10:21 AM2022-11-05T10:21:58+5:302022-11-05T10:24:37+5:30
सोलापूर लोकमत न्युज
सांगोला (अरुण लिगाडे ): सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, मोहोळ, पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याने जनावरे भक्ष्य करून फस्त केले तर माणसांवर हल्ले करून जखमी केल्याच्या घटना ताज्या असताना फळवणी (ता. माळशिरस) अकलूज रोडवर पहाटे बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांच्या तोंडच पाणीच पळाले आहे.
दरम्यान, गावात बिबट्या आल्याचे पोलीस पाटील गणेश अवताडे यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या यंत्रणेवरून नागरिकांना सावध केल्याने ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, माळशिरसचे वन प्रक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याने ग्रामस्थ सतर्क झाले आहेत.
शुक्रवारी पहाटे बावडा (ता.इंदापूर) येथील संदीप शिंदे हे कारमधून महूदकडून अकलूजकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन बिबट्या कारच्या समोरून जाताना दिसत्या क्षणी त्यांनी त्यांचे चित्रीकरण केले. सदर बिबट्या दत्तात्रय पवार यांच्या दूध डेरीजवळ बिबट्या आढळून आला, त्यांने नारायण प्रल्हाद अवताडे यांच्या संकरित गाईची कालवड व भटके कुत्रे भक्ष्य करून फस्त केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेची माहिती पोलीस पाटील गणेश अवताडे यांनी ग्राम सुरक्षा दलासह माळशिरस वनपरिक्षेत्र अधिकारी दयानंद कोकरे, वेळापुरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश बागावत, सहाय्यक फौजदार संजय राऊत, वनक्षेत्र पाल गणेश जगदाळे, शैला भोजने यांनी फळवणी गावात सदर ठिकाणी भेट देऊन बिबट्याचे ठसे फस्त केलेली कालवड पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला.
नागरिकांनी सतर्क राहावे, स्वतः ची काळजी घ्यावी, घाबरू न जाता लोकांनी रात्री फिरू नये तसेच सोबत घुंगराची काठी मोबाईलचे गाणी मोठमोठ्याने लावावेत तसेच रात्री दारे धरण्यासाठी जायचे असल्यास ग्रुपने बाहेर पडावे असे आवाहन केले आहे.