पंढरपूर तालुक्यातील गादेगावच्या सीमेवर बिबट्या; जेसेबी चालकाने काढला व्हिडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 10:05 PM2021-11-08T22:05:15+5:302021-11-08T22:05:56+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील गादेगावच्या सीमेलगत पळशी बोगद्याच्या जवळ जेसीबीच्या सहाय्याने रस्ता बनवण्याचे काम करत असताना जेसीबी चालकास बिबट्या दिसला आहे. त्या जेसीबी चालकाने बिबट्याचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले आहे.
गादेगावच्या सीमेलगत पळशी बोगद्याच्या जवळ एका शेतातील ऊस घेऊन जाण्यासाठी जेसीबीच्या साह्याने रस्ता बनवण्याचे काम माऊली नागणे ( रा. पळशी, ता. पंढरपूर) यांना बिबट्या सारखा प्राणी असल्याचे जाणवले. त्यांनी तत्काळ जेसीबी ची लाईट त्या दिशेने केली. त्यावेळी बिबट्याचं होता. त्यांनी तत्काळ मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. हे चित्रीकरण त्यांचे मित्र मारुती जाधव ( रा. पळशी) यांना कळवली.
यानंतर मारुती जाधव यांनी घडला प्रकार वन विभाग व पोलिस विभागाला सांगितला आहे. यामुळे वन परिक्षेत्र अधिकारी चैत्राली वाघ यांनी एक पथक संबंधित ठिकाणी पाठवले. या पथकामध्ये वनरक्षक सचिन कांबळे, वनपाल सुनीता पत्की, वन मजूर बाळासाहेब पिसे यांचा सहभाग आहे.
संबंधित ठिकाणचे तपासणी करण्यासाठी एक पथक पाठवले आहे. तो व्हिडिओ त्याच ठिकाणचा आहे का ? याची तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी घाबरू नये. अंधारामध्ये एकट्याने फिरू नये.
- चैत्राली वाघ, वन परिक्षेत्र अधिकारी, पंढरपूर