माझ्या वडिलांचं तैलचित्र करून द्यावं, बाबासाहेबांच्या 'त्या' पत्राची शंभरी!
By रवींद्र देशमुख | Published: May 8, 2023 11:36 AM2023-05-08T11:36:22+5:302023-05-08T11:37:22+5:30
सोलापुरात संग्रही: कोल्हापूरचे चित्रकार दत्तोबा दळवी यांना केली होती विनंती.
सोलापूर - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांची चित्रस्मृती अखंड आपल्यासोबत ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी त्यावेळचे कोल्हापुरातील प्रख्यात चित्रकार दत्तोबा दळवी यांना पत्राद्वारे वडिलांचे तैलचित्र काढण्याची विनंती केली होती..या पत्राला सोमवारी, 8 मे 2023 रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत.
दत्तोबा दळवी हे शाहू महाराजांच्या दरबारी चित्रकार होते. चित्रकलेत त्यांचा लौकिक मोठा होता. लोकराजाची दत्तोबांवर विशेष मर्जी होती. शिवाय बाबासाहेबांशी त्यांचा स्नेह होता. त्यावेळी दत्तोबा यांनी मुंबईतील सर जे. जे. महाविद्यालयातून सुवर्णपदक पटकाविले होते.
डॉ. आंबेडकर यांनी मुंबईतील परळ येथून 8 मे 1923 रोजी दत्तोबांना हे पत्र लिहिले. सोलापुरातील पंख्यात वकिल धनंजय माने यांच्या पत्नी रेखा माने या दत्तोबा दळवी यांची नात आहे. त्यांच्या संग्रही हे पत्र आहे.
पत्रात विनम्रता..
डॉ. आंबेडकर हे विद्वान होते. अनेक शास्त्रांचे ते तज्ञ होते. पण त्यांची विनम्रता, विनशीलता ही आदर्शवत.नेमके त्याचेच दर्शन या पत्रात झाले आहे. वडिलांचे तैलचित्र काढण्यास सांगताना ते लिहितात की, 'मी आपणाला तसदी देत आहे. याबद्दल माफी करणे.' बाबासाहेब इतके मोठे नेते असताना ते कलाकाराला मोठेपण देतात अन पत्रात म्हणतात,' आपल्या दर्शनाचा लाभ लवकरच होईल अशी आशा करतो.बाबासाहेबानी पवार नावाच्या व्यक्तिकरवी दत्तोबा दळवी यांना हे पत्र दिले आहे. त्यासोबत त्यांनी आपल्या वडिलांचा फोटोही दिला आहे. तैलचित्राबाबत काही सूचना देताना त्यांनी त्याचा आकार ठरविण्याचा अधिकार दत्तोबा यांनाच दिला आहे.