यावलीच्या दहशतीचा इतिहास बदलून कारगिलचा करू : अमर साबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 03:41 PM2019-09-16T15:41:38+5:302019-09-16T15:44:15+5:30
माजी आमदार राजन पाटील यांच्यावर जोरदार टीका; यावली येथे भाजप शाखेचे उदघाटन
मोहोळ : गेली अनेक वर्षे दहशतीखाली वावरणाºया यावली गावाला आता भाजपची सावली मिळाली आहे. आतापर्यंत यावलीचा इतिहास हा दहशतीचा होता. इथून पुढं यावलीचा इतिहास हा कारगील सारखा असेल, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी यावली येथे व्यक्त करताना अप्रत्यक्षपणे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका केली.
अनगर पंचक्रोशीत येणाºया यावली गावात भारतीय जनता पार्टीच्या शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे होते. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, ज्येष्ठ नेते रामभाऊ खांडेकर, संजीव खिलारे, रामदास झेंडगे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी क्षीरसागर, महिला आघाडी तालुका अध्यक्षा अंजली काटकर उपस्थित होते.
यावेळी यावलीचे नूतन शाखा अध्यक्ष तानाजी दळवे, शशिकांत दळवे, दिलीप चेंडगे, महेश चेंडगे, प्रभाकर दळवे, उल्हास सिरसट आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव खिलारे यांनी केले तर तानाजी दळवे यांनी आभार मानले.
असे अनेक मालक झालेत
भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी राजन पाटील यांच्यावर निशाणा साधताना सांगितले की, आज स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आले तरी मोहोळ तालुका अजूनही स्वातंत्र्यात नाही. आपला प्रपंच आपल्यालाच करायचा आहे. कोणताही मालक आपले काही करू शकणार नाही. असे अनेक मालक जिल्ह्यात झाले, पण सगळे आज भाजपच्या मागे येताना दिसत आहेत. सर्वसामान्य गरिबांच्या मुलांसाठी कै. भीमराव नानांनी काढलेली शाळा कोणाच्या घशात घालू नका, असे सांगितले.