चला... मोदींच्या सोलापुरी जॅकेटचा आपणच शोध घेऊ या ! सुशीलकुमार शिंदे यांचे खोचक आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:52 AM2018-10-24T11:52:05+5:302018-10-24T11:57:22+5:30
निवडणुकीत शब्द दिल्याप्रमाणे अगोदर पोलीस दलासाठी कापड घ्या...
सोलापूर : निवडणुका जिंकायच्या म्हणून काहीही ठोकून द्यायचं ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासियत. आता परवा शिर्डीच्या दौºयात त्यांनी सोलापुरातून हातमागावर विणलेले जॅकेट मिळत असल्याचा उल्लेख केला. हे ऐकून आम्ही सारेच अवाक् झालो. असे जॅकेट इथं कुठं मिळते, असा सवाल सारेच एकमेकांना करू लागले आहेत. म्हणूनच सोलापूरकरांनी आता या जॅकेटच्या दुकानाचा शोध घ्यायला हवा, असे खोचक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी सायंकाळी येथील ‘लोकमत भवन’ला भेट दिली. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना हातमाग आणि हॅँडलूममधील फरक कळला नाही.
निवडणुका जिंकून घ्यायच्या म्हणून सोलापूर येथील प्रचाराच्या भाषणात ठोकून दिलं त्यांनी. लोकांनी विश्वासानं त्यांना निवडून दिलं. पण आपण सगळ्यांनी त्यांच्याकडून याचं उत्तर घेतलंय का? सोलापुरातून किती कापड पोलीस दलाला देण्यात आलं. देशाचा पंतप्रधान एका सहीनिशी हवे तेवढं कापड घेऊ शकतो. सोलापूरसाठी त्यांनी एवढं काम केलं असतं तर आनंद वाटला असता. आता शिर्डीच्या दौºयात त्यांनी सोलापुरातून हातमागावर विणलेलं जॅकेट मिळत असल्याचा उल्लेख केला. आपण सर्वांनी या जॅकेटच्या दुकानाचा शोध घ्यायला हवा, असेही शिंदे शेवटी म्हणाले.
सोलापुरात हातमागावर जॅकेट तयार होत नाहीत. परंतु, मी २०१२ मध्ये त्यांना त्यांचे चित्र असलेले वॉल हँगिंग दिले होते. त्या वेळेस त्यांनी मी आणलेले वॉल हँगिंग उघडून दाखवावे, असा आग्रह केला. शिर्डीमध्ये त्यांना कदाचित वॉल हँगिंग म्हणायचे असेल.
- श्रीनिवास दायमा,
कोषाध्यक्ष, शहर भाजपा
मोदी नेमके काय म्हणाले मला माहीत नाही. त्यांना कुणी जॅकेट दिले असेल याची माहिती नाही. मला हा प्रश्न विचारून कशाला अडचणीत आणताय ?
- अशोक निंबर्गी, शहराध्यक्ष, भाजपा