संथ गतीने सुरू असलेल्या संत विद्यापीठाचे काम जलद करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:21 AM2020-12-22T04:21:18+5:302020-12-22T04:21:18+5:30
पंढरपूर : भारताला मोठा आध्यात्मिक वारसा आहे. तो वारसा पुढे जतन राहावा व पुढे चालवा यासाठी संत विद्यापीठ महत्त्वाचे ...
पंढरपूर : भारताला मोठा आध्यात्मिक वारसा आहे. तो वारसा पुढे जतन राहावा व पुढे चालवा यासाठी संत विद्यापीठ महत्त्वाचे आहे. परंतु पंढरपुरातील संत विद्यापीठाचे काम संथ गतीने सुरू आहे ते जलद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. जुहू मुंबई येथे आयोजित वारकरी साहित्य परिषदेच्या नवव्या संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पद्मविभूषण डॉक्टर डी. वाय. पाटील, साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्यासह वारकरी उपस्थित होते. २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस चालणाऱ्या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद पंढरपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी भूषविले.
दिंडी काढून संमेलनाची सुरुवात
राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्राथमिक स्वरूपात आलेल्या वारकरी दिंडीकरी, फडकरी मंडळाच्या प्रतिनिधींनी जुहू चौपाटीवर टाळमृदंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला. संत साहित्य संमेलनाची सुरुवात वारकरी परंपरेने दिंडी काढून झाली.
असा होता पहिला दिवस
स्वागताध्यक्ष ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी ह.भ.प अमृत महाराज जोशी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे होते. यावेळी उपस्थित महाराज मंडळींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. प्रदूषण या विषयावर ही चर्चासत्र झाले. या चर्चासत्राचे अध्यक्ष ह. भ. प. माणिक गुट्टे तर वक्ते म्हणून ह.भ.प. भाटघरे, ह.भ.प सोनटक्के यांनी सहभाग घेतला. सायंकाळी ६ ते ७ या वेळामध्ये सामुदायिक हरिपाठ घेण्यात आला. संध्याकाळी अभंग वाणी आणि कीर्तनाने आजच्या दिवसाची सांगता करण्यात आली.