आळंदी कार्तिकी सोहळ्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:47 AM2020-12-05T04:47:54+5:302020-12-05T04:47:54+5:30
पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पंढरपुरात कार्तिकी यात्रा सोहळा पार पडला आहे. मात्र, आळंदी कार्तिकी यात्रेसाठी ...
पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार पंढरपुरात कार्तिकी यात्रा सोहळा पार पडला आहे. मात्र, आळंदी कार्तिकी यात्रेसाठी वारकरी आग्रही असल्याने त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारत्मक निर्णय घेणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
श्री समस्त वारकरी-फडकरी दिंंडी समाजाची विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह श्रीसंत तुकाराम महाराज भवन येथे बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. आळंदी येथे दिंड्यांचे अगमन होणार आहे. तरी मोजक्या लोकांमध्ये सर्व नियमांचे पालन करून दिंड्यांना आळंदीमध्ये प्रवेश दिला जावा व त्यांना त्यांचे मुक्कामाच्या ठिकाणी राहण्यास परवानगी मिळावी. ८ डिसेंबरपासून १४ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये त्या दिंड्यांना आळंदी क्षेत्रस्थानी त्यांच्या मुक्कामाचे ठिकाणी, भजन, कीर्तन करण्यास परवानगी असावी. दिंड्यांचे मानकरी, फडकरी, संस्थानिक यांना कार्तिक वद्य एकादशी ११ डिसेंबर रोजी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी दर्शनास परवानगी असावी. सर्व दिंड्यांना मोजक्या लोकांमध्ये नगरप्रदक्षिणा, इंद्रायणी वंदन करण्यास परवानगी मिळावी. नगरप्रदक्षिणा करतेवेळी हजेरी मारुती श्री क्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत नामदेव महाराज यांच्या पालखीसमोर मानकरी, फडकरी, दिंडीवाले हजेरी देण्यास परवानगी असावी यासह अनेक प्रश्न महाराज मंडळींनी बैठकीदरम्यान मांडले.
यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महराज औसेकर, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, नगराध्यक्षा साधना भोसले, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तुकाराम महाराज कराडकर, भगवान महाराज पाथरुडकर, भारत महाराज पैठणकर, मोहन महाराज बेलापूरकर, विठ्ठल महाराज वासकर, बापूसाहेब महाराज देहूकर, एकनाथ महाराज नामदास, संपतराव कुंभारगावकर, बाळासाहेब महाराज उखळीकर, विवेक महाराज गोसावी, मनोहर महाराज औटी, गोपाळ महराज ठाकूर, माधव महाराज शिवणीकर, विठ्ठल पाटील उपस्थित होते.
फोटो : ०४पंड०७
पंढरपूर येथे बैठक झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाराज मंडळी.