आंदोलनाच्या धर्तीवर मदतीसाठी ‘दूध’ संस्थाचालकांचे पोलिसांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 04:33 PM2018-07-15T16:33:47+5:302018-07-15T16:36:09+5:30
शेतकरी संघटना : नुकसानीची संस्थाचालकांना भीती
सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या धर्तीवर पोलिसांची मदत घेत गावपातळीवरील संकलित झालेले दूध गोळा करण्याची तयारी प्रशासनाने केली असली तरी शेतकºयांकडून घेतलेले दूध विक्रीअगोदरच आंदोलकांनी सांडून टाकले तर त्याचे नुकसान कोण देणार, अशी भीती संस्थाचालकांमधून व्यक्त केली जात आहे.
१६ जुलैपासून राज्यात शेतकºयांना थेट अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले असून त्यासाठी जिल्हा दुग्धविकास अधिकाºयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्तांना पत्र देऊन पोलीस संरक्षण देण्याची माणगी केली आहे. याशिवाय तालुका स्तरावर शेतकरी संघटना व दूध संस्थाचालकांच्या बैठकाही पोलिसांनी घेतल्या आहेत.
सर्वच ठिकाणी पोलीस पोहोचू शकणार नाहीत, तुमच्या जबाबदारीवर दूध संकलन करण्याबाबच्या सूचना पोलिसांनी दिल्या असल्याचे सांगण्यात आले. एखाद्या गावातील संस्थेचे दूध गोळा केले व ते दूध डॉकपर्यंत येण्याअगोदरच आंदोलकांनी सांडले तर त्याचे होणारे नुकसान सोसणार कोण?, असा प्रश्न संस्था चालकांनीच उपस्थित केला आहे. त्यामुळे गावपातळीवरच्या संस्थांपुढेही दूध गोळा करावे की नको?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाध्यक्ष महामूद पटेल व पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे यांनी आंदोलन करणार असल्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे.
जिल्ह्यात १२ लाख लिटर दूध
- सोलापूर जिल्ह्यात खासगी दूध संघ १० लाख लिटर व सहकारी संघ दोन लाख लिटर असे १२ लाख लिटर दूध संकलित करतात. जिल्ह्यातील वाड्या-वस्त्यातील शेतकºयांकडून संकलित झालेले दूध खासगी व सहकारी संस्था वाहतूक करून डॉकपर्यंत पोहोच करतात. अनेक मार्गांवरून वाहतूक होणाºया दुधाच्या वाहनांना कसे संरक्षण द्यायचे, हा पोलिसांचा तर नुकसान सहन कोण करायचे हा संस्थांचा प्रश्न आहे.
मागील आंदोलनात दूध वाहक वाहनांची तोडफोड करून आंदोलकांनी दूध सांडल्याने संस्थांचे नुकसान झाले होते. शेतकºयांनी संस्थेला दूध घातले म्हणजे शेतकºयांना दुधाचे पैसे देण्याची जबाबदारी संस्थेची आहे. हे नुकसान परवडणारे नाही.
- आ. प्रशांत परिचारक, चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ