सोलापूर जिल्ह्यातील मतदार वाढीसाठी १३ लाख मतदारांनी दिले सहीचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:16 PM2019-04-16T12:16:31+5:302019-04-16T12:21:38+5:30
शाळा-शाळांमधून घेतलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ८ लाख लोकांना बचत गट, पालक, शासकीय कर्मचारी, युवा मतदार यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली आहे.
सोलापूर : जिल्ह्यात मतदान जनजागृती अंतर्गत १२ लाख ९९ हजार ८४० मतदारांची स्वाक्षरी घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मतदान जनजागृती अधिकारी तथा झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून मतदान जनजागृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या उपक्रमात शहर व जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक अशा ४८१७ शाळांमध्ये पोहोचून विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालक व कुटुंबातील सदस्यांची मी मतदान करणार या पत्रावर स्वाक्षरी घेण्यात आली. अशी स्वाक्षरी झालेली १३ लाख पत्रे जिल्हा परिषदेकडे जमा झाली आहेत. त्याचबरोबर पत्रलेखन या उपक्रमांतर्गत ४ लाख ७३ हजार २२६ पत्रे विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. तसेच शाळा-शाळांमधून घेतलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील ८ लाख लोकांना बचत गट, पालक, शासकीय कर्मचारी, युवा मतदार यांना मतदान करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी एकाच वेळी ९ हजार लोकांना प्रतिज्ञा दिली आहे. जिल्ह्यातील ४७१७ शाळांमधून ३ लाख ३० हजार १९८ विद्यार्थ्यांनी निबंध सादर केले आहेत तर रांगोळी स्पर्धेत २ लाख २३ हजार ९२१ विद्यार्थी, महिला व पालक सहभागी झाले होते.
मतदान जनजागृतीसाठी विविध अधिकाºयांनी दिलेला व्हिडीओ संदेश ७ लाख ४ हजार १५२ लोकांनी पाहिला आहे. याप्रसंगी शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, उपशिक्षणाधिकारी सयाजी क्षीरसागर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे, प्रकाश राचेट्टी, आब्बास शेख उपस्थित होते.
यांनी घेतले परिश्रम
शाळा, अंगणवाडी, बचत गट सदस्यांच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात २६७५ रॅली काढण्यात आल्या. यामध्ये ७ लाख ८९ हजार ३० लोकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये १०१८ बोर्ड, २६७५ बॅनर्स, १२५५ भित्तीचित्रे काढण्यात आली आहेत. ४५० घंटागाड्यांवर मतदान जनजागृती संदेश देण्यात आले आहेत. महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, सर्व शाळा, अंगणवाडी, स्वीप समितीचे सदस्य, अधिकारी, कर्मचाºयांनी परिश्रम घेतल्याचे भारूड यांनी सांगितले.