निर्जंतुकीकरणाचे डोम आरोग्यासाठी अपायकारक, आरोग्य सेवा संचालकांचे पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 07:42 PM2020-04-19T19:42:20+5:302020-04-19T19:44:36+5:30
शास्त्रीय आधार नसल्याचे स्पष्टीकरण; महापालिका, झेडपी आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करावी
सोलापूर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याच्या नावाखाली शासकीय कार्यालयांसह अनेक खासगी ठिकाणी उभारलेले सॅनिटेशन डोम, बोगदे बंद करावेत, असे आदेश राज्याच्या आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी महापालिकांना आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिले आहेत.
कोविड १९ उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी सॅनिटेशन डोम, टनेलचा वापर सुरू करण्यात आला आहे. या डोमच्या माध्यमातून व्यक्ती, समुहाच्या अंगावर निर्जंतुकीकरणसाठी सोडियम हायपोक्लोराइटची फवारणी करण्यात येत आहे. या डोमला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही. अनेकदा ही रसायने व्यक्तीला अपायकारक ठरु शकतात, असे आरोग्य सेवा संचालक अर्चना पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती, व्यक्ती समूह यांच्यावर निर्जंतुकीकरणासाठी या औषधांची फवारणी करु नये. फवारणीसाठी उभारलेले डोम, बोगदे यांचा वापर होऊ नये याची काळजी घ्यावी. संबंधित यंत्रणांना याबाबत माहिती द्यावी, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
सोलापुरातील डोम हटवावे लागतील सोलापूर जिल्ह्यातील काही शासकीय कार्यालये, पेट्रोल पंप, ग्रामपंचायती यांनी निर्जंतुकीकरणाचे बोगदे उभारले आहेत. काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या बोगद्यांची उभारणी केली आहे. हे डोम हटवण्यात यावेत, असे निवेदन शहरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश कावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.