लेटरपॅडचा दुरुपयोग केला, सांगोल्याच्या माजी नगराध्यक्षांना नोटीस
By रवींद्र देशमुख | Published: November 19, 2023 05:17 PM2023-11-19T17:17:00+5:302023-11-19T17:17:41+5:30
नोटीस बजावल्याने सांगोल्यात शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यात वाकयुद्ध रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सोलापूर : सध्या कोणत्याही पदावर नसताना नगरपरिषदेचे बोधचिन्ह असलेल्या लेटरपॅडचा नगरपरिषद व इतर प्रशासकीय कार्यालयात गैरवापर केल्याने सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांना नोटीस बजावली आहे. येत्या तीन दिवसात त्यांनी खुलासा मागितला आहे. दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी माजी नगराध्यक्षाला थेट नोटीस बजावल्याने सांगोल्यात शासकीय अधिकारी व राजकीय नेत्यात वाकयुद्ध रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी दिलेल्या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांनी नगरपरिषद व वरिष्ठ कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करण्यासाठी सध्या नगरपरिषदेच्या कोणत्याही पदावर नसताना त्यांनी त्यांचे नावापुढे नगराध्यक्ष व नगर पालिकेचे बोधचिन्ह असलेल्या लेटर पॅडचा वापरून विविध तारखांना पत्रव्यवहार केला आहे. याबाबत त्यांनी तीन दिवसाच्या आत खुलासा करावा अशा प्रकारची नोटीस मुख्याधिका-यानी बजावल्याने चर्चेला उधान आले आहे. दरम्यान या नोटिशीची प्रत माहितीसाठी पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दिली पाठविली आहे.
मी माझ्या लेटर पॅडचा कसलाही गैरवापर केला नाही. जनतेच्या हिताच्या कामासाठीच लेटर पॅडचा वापर केला आहे. माझ्या कार्यकाळात नगराध्यक्ष असतानाचे लेटर पॅड शिल्लक होते. शक्यतो मी प्रत्येक लेटरवर 'माजी' असे हाताने लिहीत असतो. अनावधानाने एखाद्या लेटर वरती नजर चुकीने 'माजी' असे लिहावयाचे राहिले असल्याची शक्यता आहे. मुख्याधिकारी यांनी दिलेल्या नोटीसिला मी रितसर उत्तर देणार आहे. - नवनाथ पवार, माजी नगराध्यक्ष, सांगोला