पिंपरीत शाळेवरील पत्रे उडाले, चार लाख रुपयांचे नुकसान
By काशिनाथ वाघमारे | Published: June 4, 2023 03:55 PM2023-06-04T15:55:36+5:302023-06-04T15:55:44+5:30
संगणक, बेंच, टी व्ही, टेबल,खुर्च्यांसह शैक्षणिक साहित्याचे नुकसान
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: पिंपरी (सा. ता.बार्शी) प्रशाला येथे शनिवार, ३ जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वा-यामुळे शाळेच्या सहा वर्गखोल्यावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे शाळेतील संगणक, बेंच, टी व्ही, टेबल,खुर्च्यांसह शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले.
पिंपरीतील या शाळेत पाचवी ते दहावीचे वर्ग चालतात. मात्र उन्हाळी सुटी असल्याने संभाव्य धोका टळला. संस्थाचालक डॉ. कपील कोरके यांनी या घटनेनंतर शाळेकडे धाव घेऊन पाहणी केली. या नैसर्गिक संकटामुळे अंदाजे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्रशालेचे मुख्याध्यापक विलास वळेकर यांनी केली आहे. १५ जून पासून राज्यभरात शाळा सुरू होतायत. तत्पूर्वी शाळेची दुरुस्ती केली जाईल असे संस्थापक कपील कोरके म्हणाले.