रात्री शेतात पाणी देताना जीव धोक्यात; तीन शेतकऱ्यांच्या पायास डसला साप!
By शीतलकुमार कांबळे | Published: August 25, 2023 05:04 PM2023-08-25T17:04:30+5:302023-08-25T17:05:45+5:30
या घटना दक्षिण तालुक्यातील हणमगांव, उत्तर तालुक्यातील कवठे तर तुळजापूर तालुक्यातील गंगेवाडी या तीन गावात घटना घडल्या आहेत.
सोलापूर : रात्री शेतात पाणी देताना व काम करीत असताना वेगवेगळ्या घटनेत तीन शेतकऱ्यांच्या पायास सापाने चावा घेतला आहे. या घटना दक्षिण तालुक्यातील हणमगांव, उत्तर तालुक्यातील कवठे तर तुळजापूर तालुक्यातील गंगेवाडी या तीन गावात घटना घडल्या आहेत.
राजू गोविंद राठोड (वय ४०, रा. कवठे, ता. उ. सोलापूर), दस्तगीर मताब शेख (वय ३०, रा. हणमगांव, ता. द. सोलापूर), अजय अंबादास कांबळे (वय ३६, रा. कर्णिक नगर, सोलापूर) असे सर्पदंश झालेल्या तीन शेतकर्यांची नावे आहेत. सध्या ग्रामीण भागात शेतीसाठी रात्रीची वेळ आहे, त्यामुळे बरेच शेतकरी रात्रीच्या सुमारास पाणी देण्याचे काम करतात. शिवाय शेतात दिवसा काम करीत असताना गवतात पाय गेल्यावर अनेकांना सर्पदंश झाल्याच्याही घटना ताज्या आहेत. राजू राठोड हे गोविंद तांडा येथील शेतात काम करीत असताना डाव्या पायास साप चावल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भाऊजी नीलकंठ रजपूत यांनी दाखल केले.
दस्तगीर मताब शेख (वय ३०, रा. हणमगांव, ता. द. सोलापूर) शेतात काम करीत असता उजव्या हातास साप चावला. त्याना भाऊ गैबीपीर शेख याने उपचारासाठी दाखल केले. तर अजय अंबादास कांबळे (वय ३६, रा. कर्णिक नगर, सोलापूर) यास गंगेवाडी येथील शेतात काम करीत असताना डाव्या पायास साप चावल्याने हर्षिल अहीरे याने शासकीय रूग्णालयात दाखल केले. या तीनही घटनेची नोंद सिव्हील पोलिस चौकीत करण्यात आली आहे.