कत्तलीसाठी जाणाऱ्या २०५ जनावरांना जीवदान
By संताजी शिंदे | Published: November 2, 2023 12:30 PM2023-11-02T12:30:51+5:302023-11-02T12:31:42+5:30
संबंधितांवर वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संताजी शिंदे, सोलापूर : कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणाऱ्या २०५ जनावरांची गोरक्षकांनी सुटका केली असून, संबंधितांवर वेळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती सोलापुरातील गोरक्षकांना मिळाली होती. माहितीवरून गोरक्षकांनी वेळापूर येथे माहिती घेतली असता, बोरगाव रोडमार्गे गोवंशांची मोठ्या प्रमाणात तस्करी होते, अशी माहिती मिळाली. त्यानुसार अकलूज विभाग डीवायएसपी डॉ. सई भोरे-पाटील यांना माहिती दिली. सदर ठिकाणी छापा टाकण्यासाठी पोलिसांची मदत मागितली. रात्री एकच्या सुमारास वेळापूर येथे पोलिसांच्या मदतीने सदर ठिकाणी छापा टाकला. तेव्हा तीन चारचाकी वाहने उभी होती. आतमध्ये पाहणी केली असता, जर्सी खोंड, रेडे व अन्य जनावरे निर्दयीपणे कोंबून भरलेली निदर्शनास आली.
त्यामध्ये काही गोवंश मृतावस्थेत आढळले. त्याच ठिकाणी एका पत्रा शेडमध्ये तब्बल ७० ते ८० जर्सी खोंड, वासरे डांबून ठेवलेले निदर्शनास आले, असे एकूण तब्बल २०५ गोवंश कत्तलीसाठी वाहतूक होणार होती. घटनास्थळावर एक टेम्पो (एमएच १३ सीयू ३५११), ट्रक (एमएच ४५ एएफ ५५८६) व एक नंबर नसलेले पिकअप वाहन आढळून आले. तिन्ही वाहने वेळापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहेत. जागेचा मालक व जनावराचे मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाई यशस्वी करण्यासाठी बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, बजरंग दल विभाग संयोजक सिद्राम चरकुपल्ली, पंढरपूर विभाग संयोजक आकाश धोत्रे आदी गोरक्षकांनी परिश्रम घेतले.