विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जिवदान; तब्बल दोन तासानंतर पाण्यातून काढले बाहेर!
By संताजी शिंदे | Published: March 23, 2023 12:34 PM2023-03-23T12:34:33+5:302023-03-23T12:35:21+5:30
उत्तर तालुक्यातील कुमठे येथील सावतखेड घोडातांडा परिसरातील शेतात पडलेल्या कोल्ह्याला जिवदान देण्यात आले.
संताजी शिंदे, सोलापूर: उत्तर तालुक्यातील कुमठे येथील सावतखेड घोडातांडा परिसरातील शेतात पडलेल्या कोल्ह्याला जिवदान देण्यात आले. पाण्यात पडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी धडापड करणाऱ्या कोल्ह्याला तब्बल दोन तासानंतर बाहेर काढण्यात यश आले. बाहेर आल्यानंतर कोल्हा ऊसाच्या शेतात पळून गेला.
गुरूवारी सकाळी संदीप माणिक पवार यांच्या शेतातील विहिरीत एक कोल्हा पडला होता. संदीप पवार हे शेतात पाणी देण्यासाठी म्हणून विहिरीत असलेली मोटार चालू करताना, त्यांना विहिरीत पाण्याचा आवाज आला. त्यांनी विहिरी जवळ जाऊन पाहिल असता आतमध्ये कोल्हा पाण्यावर पोहत स्वत:चा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. संदीप पवार यांनी तत्काळ गावातील राहुल पवार यांना फोन करून माहिती दिली.
राहुल पवार यांनी कोल्हा विहिरीत पडल्याची माहिती देण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयाला केला, पण ऑफिस बंद असल्याने फोन उचलला गेला नाही. राहुल पवार यांनी याबाबत तत्काळ चेतन गायकवाड यांना माहिती दिली. गायकवाड यांनी लगेचच वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनचे सदस्य संतोष धाकपाडे यांच्याशी संपर्क साधून कोल्हा पाण्यात पडल्याची माहिती दिली. संतोष धाकपाडे, सुरेश क्षीरसागर, अजित चौहान आणि ओंकार घुले हे सर्वजण घटनास्थळी पोहचले. भाजीचे कॅरेट, दोरी आणि बांबू या उपलब्ध असलेल्या साधनाने सर्व सदस्यांनी कोल्ह्याला अलगद बाहेर काढले. कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी दोन तासाचा कालावधी लागला. कोल्हा कॅरेटमध्ये बसून वर आल्यावर, क्षणातच तो तिथून ऊसाच्या शेतात पळाला. या बचाव कार्यात वाईल्डलाईफ काँझर्वेशन असोसिएशनच्या सदस्यांबरोबर विजय राठोड, राहुल पवार, सद्दाम शेख, आदीनी परिश्रम घेतले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"