उन्हामुळे मतमोजणी कर्मचाऱ्यांना हलका आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:02 AM2019-05-22T11:02:06+5:302019-05-22T11:47:05+5:30
सोलापूर, माढा लोकसभेसाठी उद्या मतमोजणी; महिला बचत गटाकडून पुरवठा, फक्त तेरा रुपयांत नाष्ट्याची सोय
संतोष आचलारे
सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी होत आहे. सोलापुरातील रामवाडी येथील गोदामात मतमोजणीची प्रक्रिया करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांना कडक उन्हामुळे सहज पचेल असा हलका फुलका आहार देण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. आहार पुरवठा करण्यासाठी भीमानगर येथील सुभदा महिला बचत गटाची निवड करण्यात आली आहे. या बचत गटाकडून फक्त तेरा रुपयांत नाष्टा पदार्थ उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
मतमोजणी प्रक्रियेत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेकडून आहाराचा खर्च करण्यात येत आहे. निवडणूक लढवित असलेले उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी बचत गटाकडून रास्त दराने स्वतंत्र आहार पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूरचा पारा ४५ अंशांवर गेला आहे. अशा परिस्थितीत भूक मंदावण्याचा प्रकार होतो. मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कर्मचाºयांना सकाळी सहा वाजता गोदामात उपस्थित राहावे लागणार आहे. शुक्रवारचा संपूर्ण दिवस व संपूर्ण रात्र मोजणीसाठी कर्मचाºयांना याठिकाणीच राहावे लागणार आहे. अशा परिस्थितीत कामाचे योग्य संतुलन राहण्यासाठी संतुलित आहाराचा मेनू निवडणूक कार्यालयाकडून निश्चित करण्यात आला आहे.
मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पुरी किंवा चपातीऐवजी हलका आहारात देण्यात येणार आहे. याशिवाय बटाटा रस्सा, कोशिंबीर, कोबी, दाल तडका, रबडी जिलेबी आदी खाद्यपदार्थ देण्यात येणार आहेत़ थंड मठ्ठा व जारच्या थंड पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणीवेळी उपस्थित असलेल्या राजकीय प्रतिनिधींसाठीही तोच आहार ठेवण्यात आला आहे. यात बैंगन मसाला व गुलाब जामून असे दोन पदार्थ पर्यायी ठेवण्यात आले आहेत. चहाच्या एका कपासाठी सहा रुपये तर नाष्ट्याकरिता १३ रुपये दर आकारण्यात येणार आहे. आहारासाठी ९७ रुपयांचा दर ठेवण्यात आला आहे.
आहाराच्या व्यवस्थेसाठी २७५ कर्मचारी
रामवाडी येथील गोदामात मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ताफा असणार आहे. या सर्वांना आहार, चहापाणी व नाष्ट्याची सोय करण्याची जबाबदारी बचत गटावर सोपविण्यात आली आहे. या सर्वांना वेळेत आहाराचा पुरवठा करण्यासाठी बचत गटाने एकूण २७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.