सांगोल्यात वीज कोसळून सासू-सून ठार
By admin | Published: May 28, 2014 01:35 AM2014-05-28T01:35:08+5:302014-05-28T01:35:08+5:30
सांगोला : सांगोला शहरांतर्गत पंढरपूर रोडवरील सावंत वस्ती या ठिकाणी वादळी वारे व पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली बसलेल्या चुलत सासू-सुनेवर अचानक वीज कोसळून त्या जागीच ठार झाल्या.
सांगोला : सांगोला शहरांतर्गत पंढरपूर रोडवरील सावंत वस्ती या ठिकाणी वादळी वारे व पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली बसलेल्या चुलत सासू-सुनेवर अचानक वीज कोसळून त्या जागीच ठार झाल्या. ही घटना मंगळवारी दु. ३.३० वा. च्या सुमारास घडली. इंदूबाई बंडू सावंत (वय ४५) व सुभद्राबाई सुखदेव सावंत (वय ५२, रा. सांगोला-सावंत वस्ती) अशी वीज पडून ठार झालेल्या सासू-सुनेची नावे आहेत. इंदूबाई सावंत, सुभद्राबाई सावंत व सुवर्णा सावंत या तिघी मुलीसह चुलत सासू-सुना मंगळवारी दु. ३ वा.च्या सुमारास गवत आणण्यासाठी घरापासून हकेच्या अंतरावरील शेतात गेल्या होत्या. गवत काढताना अचानक विजांच्या कडकडाटात वादळी वार्यासह पावसास सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी या दोघी झाडाखाली थांबल्या तर सुवर्णा भिजत घराकडे पळत गेली. इंदूबाई सावंत व सुभद्रा सावंत या दोघींवर अचानक वीज कोसळल्याने दोघी जागीच ठार झाल्या. यावेळी पाऊस थांबल्यानंतर सुवर्णा सावंत गवारीच्या शेंगा काढण्यासाठी शेतात जात असताना दोघी झाडाखाली झोपल्याचे पाहिले. यावेळी तिने दोघींना उठवण्याचा प्रयत्न केला असता कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. सुवर्णा हिनेच आरडाओरड करुन वस्तीवरील नातेवाईकांना बोलावून घेतले. दोघींनाही तत्काळ सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. पीयूष साळुंखे यांनी त्या मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची शिवाजी नामदेव सावंत यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सविता कलटवाड करीत आहे. शासकीय मदतीचे आश्वासन शहरातील सावंत वस्ती याठिकाणी वीज पडून महिला ठार झाल्याचे वृत्त समजताच आ. गणपतराव देशमुख, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह शहरातील अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी आ. देशमुख यांनी घडल्या प्रकाराची माहिती घेऊन सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन महसूल कर्मचार्यांना रितसर पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच मृत पावलेल्या सावंत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले
. --------------------------
तर आई व चुलती वाचल्या असत्या दुपारी ३ वा.च्या सुमारास वातावरणात बदल झाल्याने वादळी वारे वाहू लागले. पावसाची चिन्हे दिसू लागल्याने श्रीमती इंदूबाई सावंत हिची मुलगी मैना हिने आई वारा सुटला आहे. पाऊस येऊ लागला आहे. गवत काढण्यासाठी जाऊ नको म्हणून मनाई केली होती; मात्र क्षणातच आपली आई व चुलती वीज पडून ठार झाल्याचे समजताच मुलगी मैनाने आई तू माझे का ऐकले नाही म्हणून हंबरडा फोडला. यावेळी उपस्थित महिला व नागरिकांना अश्रू अनावर झाले.