बाष्पीभवनामुळे उजनीतील पाणी प्रतिदिन एक टक्का होतेय कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 03:27 PM2019-04-25T15:27:26+5:302019-04-25T15:28:55+5:30
सोलापूर जिल्ह्यात टंचाईचे संकेत; नियोजन कोलमडल्याने एप्रिलमध्ये मायनस ३२.५३ टक्क्यांवर !
भीमानगर : नियोजनाअभावी उजनी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत चालली असून, यामुळे धरण उघडे पडलेले दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात ११० टक्के भरलेले धरण सात महिन्यांत आणि एप्रिलमध्येच मायनस ३२.५३ टक्क्यांपर्यंत गेले आहे. यामुळे पाणी कपातीच्या संकटाला सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील गावे, शेतकºयांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोल्यासह अनेक शहरांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.
दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत चालल्याने बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढले आहे. रोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत असून, या पाण्यातून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार आहे. जिल्ह्यात चालू वर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळी खूप कमी झाली आहे. विहिरी व बोअरवेलनी तर मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. शेतकºयांना पाण्याचे नियोजन तर अत्यंत काटकसरीने करावे लागणार आहे.
कालवा व बोगद्याचे तोंड बंद पडले असून, आता पाणीच नसल्यामुळे कालवा व बोगद्याकाठच्या शेतकºयांची पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस पडल्यानंतर धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतर कालवा व बोगद्याला पाणी सोडता येणार आहे.
गतवर्षी प्लस २१.८३ टक्के पाणीसाठा
- उजनीची पाणीपातळी ४८८.१८० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १३०९.२८ दलघमी आहे. उपयुक्त पाणीसाठा मायनस ४९३.५३ दलघमी आहे. एकूण टीएमसी ४६.२३ आहे तर उपयुक्त टीएमसी मायनस १७.४३ आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीत पाणीसाठा प्लस २१.८३ टक्के होता.