पालिकेच्या विधान सल्लागाराची उचल म्हणे तब्बल पासष्ट लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:23 PM2019-07-16T12:23:07+5:302019-07-16T12:26:22+5:30
सोलापूर महापालिकेचा हिशोब लागेना; कोणत्या वकिलांना किती दिली फी?
सोलापूर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकाºयांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशोब दोन महिन्यात लागलेला नाही. विधानसल्लागार कार्यालयाने पाच वर्षांत घेतलेली ६५ लाख ४९ हजार इतकी रक्कम कोणाला दिली याचा ताळमेळ लागेना झाला आहे.
आयुक्त दीपक तावरे यांनी पदभार घेतल्यानंतर महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पैशाचे नियोजन करण्याचे काम हाती घेतले. तिजोरीचा हिशोब घेतल्यानंतर अनेक उचल रकमांचा हिशोब लागत नसल्याचे लक्षात आले. त्यांच्या सूचनेनुसार मुख्य लेखापरिक्षक अजय पवार यांनी सर्व विभागप्रमुखांना उचल रकमांचा हिशोब देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सर्व कार्यालये कामाला लागली. पण अनेक कार्यालयांना गेल्या पाच वर्षांचा हिशोब लावणे अवघड जात आहे. ज्यांच्याकडून हिशोब येणार नाही अशा कार्यालयांच्या प्रमुखांकडून संबंंधित रकमा वसूल केल्या जातील असा इशारा उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिला होता. इतके करूनही अनेक विभागाने हिशोब दिला नसल्याचे दिसून आले आहे.
विधान सल्लागार कार्यालयाने सन २०१२ ते मार्च २०१९ या कालावधीत जवळजवळ ६५ लाख ४९ हजार इतकी रक्कम उचल घेतल्याचे दिसून येत आहे. सन २०१० ते मार्च २०१२ पर्यंतच्या रकमेचा हिशोब देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण जवळजवळ ५० लाख १५ हजारांचा अद्याप हिशोब लागलेला नाही. वेळोवेळी उच्च न्यायालयातील वकिलांच्या फीसाठी म्हणून ३० हजारांपासून पाच लाखांपर्यंत उचल घेण्यात आली.
एका वकिलाने १ लाख ३० हजार फी पोटी रक्कम घेतल्याचे विधानसल्लागाराच्या खात्यावर वटलेल्या धनादेशावरून दिसून येते. पण त्या वकिलाने पुन्हा महापालिकेकडे तितक्याच रकमेची फी मागितली आहे. विधानसल्लागार कार्यालयाने उचललेल्या इतक्या रकमेचा टीडीएस कापला गेला का असा लेखा परिक्षकाने सवाल उपस्थित केल्यावर हे प्रकरण समोर आले आहे. आता कोणत्या वकिलाला किती फी दिली हे व्हाऊचर तपासल्यानंतर लक्षात येणार आहे. स्थायी समितीच्या निर्णयानुसार वकील फी ३0 हजार ठरलेली आहे. त्यापुढील फीच्या प्रकरणाचा हिशोब सर्वसाधारण सभेकडे पाठविणे गरजेचे आहे. असे असताना आत्तापर्यंत एकही प्रकरण सभेकडे आले नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेत शुकशुकाट
- महापालिकेची ही स्थिती असताना सदस्यांनी अधिकाºयांना लक्ष्य केले आहे. नगरसेवक किरण देशमुख यांनी उपायुक्त त्रिंबक ढेंगळे—पाटील, सहायक विधानसल्लागार संध्या भाकरे यांच्या कामाबाबत आयुक्त दीपक तावरे यांना पत्र दिले आहे. या पत्रावर ४० सदस्यांच्या सह्या आहेत.
महापालिकेतील जुनी प्रकरणे उकरून काढल्यामुळे अनेक अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. आयुक्त तावरे प्रशिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने सोमवारी महापालिकेत शुकशुकाट होता. वडकबाळजवळ महामार्गाचे काम करताना रविवारी जलवाहिनी फुटून तळे साचले तरी त्याची दखल घेण्यास कोणी वाली नव्हता. उप अभियंता धनशेट्टी हे आजारी आहेत. माहिती मिळाल्यावर त्यांनी कर्मचाºयांना पाठविले आहे. पण आता हे काम करायचे तर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.