विमानतळाच्या धर्तीवर सोलापूरातील रेल्वेस्थानकावर सुविधा देण्याच्या हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:27 PM2018-08-14T15:27:43+5:302018-08-14T15:29:45+5:30
सोलापूरसाठी १० कोटी : नियोजन केले, प्रतीक्षा निधी तरतुदीची
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : महाराष्ट्रातील सहा आणि देशभरातील ८४ अशा एकूण ९० रेल्वे स्थानकांवरील सेवासुविधा या विमानतळाच्या धर्तीवर वाढवण्याच्या हालचाली आहेत़ महाराष्ट्रातील सहा स्थानकांमध्ये सोलापूरच्यारेल्वे स्थानकाचा समावेश असून या स्थानकावरील सेवा-सुविधा वाढवण्यासाठी ५ ते १० कोटींची तरतूद करण्यात येत आहे़
पुनर्विकास योजनेतील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे, वाय फाय, इमारतीचे नूतनीकरण, मॉड्यूलर वॉटर कियोस्क, पाण्यासाठी एटीएम, एलईडी लाईट्स, लिफ्ट, सरकते जीणे, स्टेनलेस स्टीलची बाके, खाद्यपदार्थांच्या मॉड्यूलर कियोस्कसह अनेक सेवासुविधा दिल्या जात आहेत़ यापैकी सरकते जीणे, लिफ्ट, सीसीटीव्ही, वायफाय अशा बहुतांश सेवासुविधा सोलापूर स्थानकावर उपलब्ध असून उर्वरित सेवासुविधासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत़ रेल्वे बोर्ड या कामांची निविदा काढत असल्याचे वृत्त आहे़ बोर्डाने त्याची एकूण किमतही ठरवली आहे़
याशिवाय सोलापूर विभागात नॅरोगेजची जमीन संपादित करून सौरऊर्जेची शेती केली जाणार आहे़ पहिल्या टप्प्यात ४० हेक्टरवर सोलर पॅनल बसवण्याचे निश्चित केले आहे़ सोलापूर विभागात नॅरोगेजच्या जमिनी मोठ्या प्रमाणात असून या कामासाठी ती वापरली जाणार आहे़ सप्टेंबरमध्ये स्थानकावरील कव्हर शेडवर सोलर पॅनल बसवले जाणार आहे़
सोलापूर- उस्मानाबादसाठी जमीन संपादन सुरु
सोलापूर-उस्मानाबाद नव्या रेल्वे लाईनसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या सुरु आहे़ सोलापूर, बाळे, केगाव, खेड, तामलवाडी मार्गे ही नवी लाईन अंथरली जात असून याचा नकाशाही तयार आहे़ नकाशात सुचविलेल्या लाईननुसार त्या-त्या ठिकाणच्या जमिनी संपादन करण्याचे काम सुरु आहे़ याबाबत बोर्डाचे एक पत्रही २५ जुलै रोजी सोलापूर रेल्वेला प्राप्त झाले आहे़ यामध्ये राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची आहे़ त्यांनी जितक्या लवकर जमिनी उपलब्ध करुन देतील तेवढ्या लवकर लाईन तयार होईल़ या कामासाठी पहिल्या टप्प्यात ९़५३ कोटी तरतूद अपेक्षित आहे़
बहुतांश सेवासुविधा रेल्वे स्थानकावर आहेत़ रेल्वे स्थानक विमानतळासारखे होणार नाही; मात्र विमानतळाच्या धर्तीवर सेवा सुविधा दिल्या जाणार आहेत; मात्र यासाठी ५ ते १० कोटींचा निधी अपेक्षित असून त्याची रेल्वे बोर्डाकडून लवकरच तरतूद होणार आहे़ त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत; मात्र रेल्वे बोर्डाने केलेल्या सूचनेनुसार याबाबतचे नियोजन झाले आहे़ मंजुरीअंती सोलापूर-उस्मानाबादच्या सर्वेक्षण कामाला सुरुवात होईल़
- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय व्यवस्थापक