शरीर आणि आतला जीव यांच्यामधला दुवा म्हणजे मन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 02:10 PM2020-12-10T14:10:24+5:302020-12-10T14:10:47+5:30
विचार करण्याची क्षमता असणारा तो मानव
पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व मन अशी अकरा इंद्रिये आयुर्वेद शास्त्रात सांगितलेली आहेत. स्वास्थ्याचा विचार केल्यास या दहाही इंद्रियांना काबूत ठेवणारे हे मन होय. त्यामुळे मनाच्या स्वास्थ्याची काळजी घेणे खूपच आवश्यक व महत्त्वाचे आहे. शरीर आणि आतला जीव किंवा आत्मा यांच्यामधला दुवा म्हणजे मन!
‘मननात् मनः’ म्हणजे मनन करणारे, विचार करणारे ते मन होय. मनावरूनच मानव शब्द आलेला आहे. विचार करण्याची क्षमता असणारा तो मानव. ज्ञान हे मनाच्या सहयोगानेच प्राप्त होते. आत्मा, इंद्रियं व इंद्रियांचे विषय (म्हणजे डोळे व डोळ्यांनी पाहणे, कान व कानांनी ऐकणे किंवा जिव्हा व जिव्हेने पदार्थांची चव घेणे वगैरे) यांचा संयोग झाला तरी त्याबरोबर जर मनाचा सहभाग असला तरच ज्ञान होते, अन्यथा ज्ञान होऊ शकत नाही. म्हणूनच ज्ञान होणे किंवा ज्ञान न होणे हे सर्वस्वी मनावरच अवलंबून आहे.
नेमके हेच विद्यार्थ्यांमध्ये घडते. शिक्षक जे शिकवतात ते विद्यार्थी ऐकतात, पाहतात व मन मात्र भरकटत असते. घरी आज जेवण काय बनवलं असेल? नवीन सांगितलेली खेळणी आणली असतील काय? अशाप्रकारचे विचार जर मनात चालू असतील तर मग ज्ञान कसे होईल? म्हणूनच आयुर्वेदशास्त्रामध्ये ‘ब्राह्म मुहूर्तावर’ म्हणजे सकाळी ४.३० वा. उठायला सांगितले आहे.
कारण ही वेळ सात्विक असते. ईशचिंतनाकरिता योग्य असते. आजकाल विद्यार्थी रात्री बारा-एक वाजेपर्यंत अभ्यास करतात पण सकाळी मात्र उठायला टाळतात. सकाळी उठून सूर्यनमस्कार घालून जप आणि ध्यान यांचा अभ्यास केल्यास जपध्यानाद्वारे मन बलशाली होते. मनाची एकाग्रता वाढल्याने मेंदूचा/बुद्धीचा विकास होतो. ध्यानाच्या अभावाने मन एकाग्र होत नाही. मन सतत चिंतातूर राहते व आत्महत्येसारखे गुन्हे घडत राहतात. अमेरिकेत भारतातील योग भारतापेक्षा लोकप्रिय झाला आहे,सध्या रामदेव बाबा यांचे ध्यान आणि प्राणायाम जगभर गाजत आहे. आजची व पुढची पिढी मानसिकदृष्ट्या सखक्त करण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमातच याचा समावेश व्हायला हवाच. तरंच मनोरुग्णांचे प्रमाण तसेच आत्महत्येचे प्रमाण आटोक्यात येईल.
- विनायक सुतार, शिक्षणतज्ञ