दारू सुटली...तंटे मिटले...पोलीसही हटले !--परिवर्तनाच्या वाटेवर पारधी समाज
By admin | Published: December 19, 2014 12:39 AM2014-12-19T00:39:05+5:302014-12-19T00:46:39+5:30
अनुकरणीय : सहा वर्षांत नाही चढली पोलीस ठाण्याची पायरी
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर --फासेपारधी वसाहत म्हटले की, गुन्हेगारांची वस्ती असा एक समज पोलीस आणि समाजाचाही असतो; पण या समाजाला छेद देण्याचे काम उचगाव (ता. करवीर) येथील फासेपारधी वसाहतीने केले आहे. गेल्या सहा वर्षांत या वसाहतीतील कुणीही पोलीस ठाण्याची पायरी चढलेले नाही. याचाच अर्थ या वसाहतीतील अथवा वसाहतीबद्दल एकही गुन्हा पोलीस ठाण्यात नोंद नाही. समाजातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एका ‘बदनाम’ वसाहतीची ही कामगिरी सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घालणारी ठरावी.
मुळात फासेपारधी समाजाचा कोल्हापुरातील इतिहासही तसा संघर्ष आणि परिवर्तनाचाच आहे. १८व्या शतकामध्ये कर्नाटकातील मुधोळ संस्थानात हा समाज मोठ्या संख्येने राहत होता. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शिकारीच्या छंदामुळे तो समाज महाराजांच्या संपर्कात आला. तेथून कोल्हापुरात फासेपारधी वास्तव्यास आले. महाराजांनी त्यातील काहीजणांना वाड्यावरही पहारेकऱ्याची नोकरी दिली. सोनतळी येथे विटा तयार करणे, घर बांधणे, असे प्रशिक्षण दिले. कळंबा कारागृहापासून सीपीआर हॉस्पिटलपर्यंत असलेले खंदक बुजविण्याचे कामही दिले. राधानगरी धरण बांधकामाच्यावेळीही काम दिले. यामुळे समाज येथेच स्थिरावला.
१९५३ च्या सुमारास समाजातील काही जाणत्या मंडळींनी शासनाकडे पाठपुरावा करून जिल्ह्यातील उजळाईवाडी, तामगाव, मुडशिंगी, नेर्ली या गावांत समाजाला सुमारे ५०० एकर जागा निवाऱ्यासाठी मिळवली, परंतु उजळाईवाडीची जागा विमानतळासाठी संपादित करण्यात आली. अन्य गावांतील बहुतांश जमीन उद्योगधंद्यांसाठी कवडीमोल दराने घेतली. त्यामुळे पुन्हा समाजाच्या नशिबी भटकंती येऊन व्यसनाधीनता, गुन्हेगारी वाढली.
दरम्यान, शिवाजी विद्यापीठ आहे त्या परिसरात ८० एकर जमीन या समाजाला मिळाली. मात्र, संरक्षण खात्याला जमीन लागणार आहे, असे सांगून तेथूनही त्यांना हटविण्यात आले. त्यामुळे नव्या जागेचा शोध सुरू झाला. डोंगराळ, गावाबाहेर म्हणून उचगावजवळ १२ एकर जागा शासनाकडून समाजाला मिळाली. तेथेच सध्याची ही वसाहत आहे. गुन्हेगारी वाढल्याने ही वसाहत नेहमीच पोलिसांचे ‘टार्गेट’ असायची.
१९८२ साली पोलिसांनी चोरी, दरोडेखोरीचा आळ ठेवून वसाहतीवर मोठा छापा टाकला. मध्यरात्री घरात मिळतील त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन बदडले. यामध्ये निष्पापांना त्रास झाला. या त्रासाला कंटाळून दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा समाज पोलिसांच्या विरोधात लढण्यास एकत्र आला. त्यानंतर पोलिसांचा त्रास कमी झाला. २००९-१० नंतर तर त्यांची राज्यातील तमाम पारधी बांधवांसाठी आदर्श ठरेल, अशीच वाटचाल सुरू आहे. (क्रमश:)
अभिमानास्पद परिवर्तन
समाजाला सुरुवातीपासून संघटित करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
ज्या-ज्या वेळी पोलिसांकडून अन्याय झाला त्या-त्या वेळी धावून गेलो. आज वसाहतीमधील समाजाचे आदर्शवत परिवर्तन होत आहे. मी पाहिलेले स्वप्न हा समाज संघटितपणे आणि जिद्दीने पूर्ण करीत आहे. तंटे, मतभेद एकत्र बसून मिटवितो,याचा मला अभिमान आहे.
- व्यंकाप्पा भोसले, दलितमित्र
भांडणे मिटतात कशी ?
वसाहत तंटामुक्त झाली म्हणजे तिथे वाद-विवाद, घरगुती भांडणे होतच नाहीत, असे नाही. ती होतात. अशावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि पंचमंडळी एकत्र येतात. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतात आणि योग्य तो तोडगा सुचवितात. या पंचमंडळींबद्दल समाजात अतीव आदर असल्याने तो तोडगा मान्य केला जातो. त्यामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढायची वेळच येत नाही.
उचगाव येथील फासेपारधी वसाहत गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. या वसाहतीसंदर्भातील शेवटचा गुन्हा २००८ साली नोंद झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. सध्या चेन स्नॅचिंग, चोरी, दरोडे यासारख्या गुन्ह्यांत सुशिक्षितांचीही मुले अडकल्याचे पाहतो. या पार्श्वभूमीवर या वसाहतीचे काम इतरांसाठीही अनुकरणीय आहे.
- संभाजी गायकवाड
सहायक पोलीस निरीक्षक, गांधीनगर पोलीस ठाणे.