लोकसभेसाठी इच्छुक सात जणांची यादी वरिष्ठांकडे, १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात सभा
By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 30, 2024 12:57 PM2024-03-30T12:57:27+5:302024-03-30T12:59:42+5:30
उमेदवाराच्या प्रचारासाठी १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकर यांची सोलापुरात सभा होणार असल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली.
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : वंचित बहुजन आघाडीकडून सोलापूर लोकसभा मतदार संघात उमेदवार दिला जाणार असून त्याची तयारी म्हणून रंगभवन येथील समाज कल्याण केंद्रात पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली आहे. या बैठकीत इच्छुक सात उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. इच्छुकांची यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रविवारी, ३१ मार्च रोजी उमेदवार जाहीर होणार असून उमेदवाराच्या प्रचारासाठी १९ एप्रिल नंतर प्रकाश आंबेडकर यांची सोलापुरात सभा होणार असल्याची माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली.
वंचितचे सोलापूर लोकसभा मतदार संघाचे प्रभारी प्रा. सोमनाथ साळुंखे, डॉ. क्रांतीताई सावंत, युवक निरीक्षक चंद्रकांत घाटे आदी सोलापुरात तळ ठोकून आहेत. प्रभारींच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात बैठका सुरू आहेत. समाजकल्याण केंद्रात इच्छुक उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सोलापुरात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला. या वेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड, युवक अध्यक्ष पांडुरंग खांडेकर, महासचिव अनिरुद्ध वाघमारे, उपाध्यक्ष रवी थोरात, संघटक जालिंधर चंदनशिवे, रविकांत रांझणेकर, शहर युवक अध्यक्ष अझरोद्दीन शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.