पशुपालक, व्यापाऱ्यांनी स्वत:च्या जबाबदारीवर भरविला सांगोल्यातील जनावरांचा बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:43+5:302021-09-13T04:21:43+5:30
मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे पश्चिम महाराष्ट्रात जातीवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेला सांगोल्यातील जनावरांचा बाजार बंद होता. याचा परिणाम ...
मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे पश्चिम महाराष्ट्रात जातीवंत खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेला सांगोल्यातील जनावरांचा बाजार बंद होता. याचा परिणाम बाजारातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे जनावरांचा बाजार कधी एकदा सुरू होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, जिल्हाधिकारी सोलापूर यांनी इतर तालुक्यातील जनावरांचे आठवडा बाजार सुरू करण्यासाठी परवानगी दिली. मग सांगोल्यातील बंद का? असा संतप्त सवाल पशुपालक शेतकरी, व्यापाऱ्यांनी केला.
सद्य परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यासह सांगोल्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने टप्प्याटप्प्याने उद्योग धंदे, व्यवसाय सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत परवानगी नसल्याने सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जनावरांचा बाजार बंदच ठेवला आहे.
कवडीमोल किमतीत जनावरांची विक्री
शेतकरी पशुपालक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या परवानगीची वाट न पाहता स्वतः जबाबदारी घेऊन रविवारी जनावरांचा बाजार भरविल्याने शेजारील कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी खिलार जनावरांसह संकरित गाई, म्हैस, खरेदीसाठी गर्दी केली होती. दरम्यान
बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना ना जनावरे विक्री ना खरेदी करता येत नव्हती. ज्यांना पैशाची गरज होती असे शेतकरी, पशुपालक कवडीमोल किमतीला जनावरे विक्री करुन आपली आर्थिक अडचण भागवत होते.
सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलले..
संकरित गाय, म्हैस, खिलार जनावरांना खरेदी-विक्रीसाठी अपेक्षित दर मिळत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होतच होते. तर व्यापाऱ्यांना कुटुंबाचा दैनंदिन उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. दरम्यान, सांगोल्यातील जनावरांचा बाजार रविवारी सुरू झाल्यामुळे हातावरचे पोट असणारे हॉटेल, चहा, वडापावचे स्टॉल, चारा विक्री व्यवसाय सुरू झाल्याने तर वाहन चालक-मालकांच्या थांबलेल्या वाहनांची चाके रस्त्यावर धावू लागल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलल्याचे दिसून आले होते.
फोटो ओळ ::::::::::::::::::::::
सांगोला येथील जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी आलेल्या खिलार जनावरांसह संकरित गाईचे छायाचित्र.