लॉकडाऊनचा वस्त्रोद्योगाला मोठा फटका; महिनाभरात दीडशे कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 03:28 PM2021-05-19T15:28:04+5:302021-05-19T15:28:07+5:30

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनमुळे वस्त्रोद्योगाला जवळपास दीडशे कोटींचा फटका बसला असून ३५ हजाराहून ...

Lockdown hits textile industry; Turnover of Rs 150 crore stalled in a month | लॉकडाऊनचा वस्त्रोद्योगाला मोठा फटका; महिनाभरात दीडशे कोटींची उलाढाल ठप्प

लॉकडाऊनचा वस्त्रोद्योगाला मोठा फटका; महिनाभरात दीडशे कोटींची उलाढाल ठप्प

Next

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात १५ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनमुळे वस्त्रोद्योगाला जवळपास दीडशे कोटींचा फटका बसला असून ३५ हजाराहून अधिक यंत्रमाग कामगाराची मजुरी थांबली आहे. याचा फटका यंत्रमाग उद्योजकांसोबत कामगारांनाही मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लॉकडाऊन लागू झाले. लॉकडाऊन करत असताना प्रतिबंधक उपाययोजनांची नियमावली लागू करून वस्त्रोद्योगाला परवानगी देण्यात आली. सोलापुरातील यंत्रमाग कारखान्यांमध्ये कामगारांसाठी राहण्यासाठी सोय नसल्याने त्यांना तिथे ठेवून कारखाने सुरू करणे शक्य नसल्याने जवळपास ९० टक्के कारखाने बंदच आहेत. सोलापुरात आठशे कारखानदार असून त्यांच्याकडे १४ हजार यंत्रमाग आहेत. या कारखान्यांमध्ये सुमारे ४० हजार कामगार काम करत आहेत. परंतु आता यातील केवळ दहा टक्केच कारखाने सुरू आहेत.

लॉकडाऊनमुळे कामगारांना येण्याजाण्यासाठी अडचण असल्याने कामगारांअभावी कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे दररोज पाच कोटी याप्रमाणे महिनाभरात दीडशे कोटींचा फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये कारखाने बंद ठेवावे लागल्याने झालेल्या नुकसानीतून कारखानदार अजूनही सावरलेले नसताना आता पुन्हा दुसऱ्या वर्षीही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे कारखानदारांना आता आपला उद्योग बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही, अशी खंत कारखानदारातून व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या महिन्याभरापासून यंत्रमाग कारखाने बंद असल्याने कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विविध कामगार संघटनांनी कामगारांना अनामत देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सहायक कामगार आयुक्तांनी यात मध्यस्थी करून यंत्रमाग कारखानदारांशी चर्चा केली. त्यानंतर कामगारांना दोन हजार रुपये अनामत देण्याचे कारखानदारांनी मान्य केले आहे. त्यामुळे या अनामत रकमेचा कारखानदारांवर सुमारे आठ कोटींचा बोजा पडणार असल्याचे सांगण्यात आले.

यंत्रमाग उद्योग कमालीचा अडचणीत

सोलापूर जिल्हा यंत्रमाग उद्योगधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी लोकमतला सांगितले, सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन झाल्याने यंत्रमाग उद्योग कमालीचा अडचणीत आला आहे. सध्याच्या लॉकडाऊनमध्ये कामगारांना कारखान्यात ठेवून कारखाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोलापुरातील यंत्रमाग कारखानदारांना कामगारांना कारखान्यात ठेवणे गैरसोयीचे व आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे नाईलाजास्तव कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. लॉकडाऊनमुळे कामगारांना ये-जा करण्यास अडचणी येत आहेत. कामगारांना ये-जा करण्यास परवानगी दिली तर कारखाने पूर्ववत सुरू राहतील.

Web Title: Lockdown hits textile industry; Turnover of Rs 150 crore stalled in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.