लॉकडाऊनचा फटका.. उदरनिर्वाह करायचा कसा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:16+5:302021-04-08T04:22:16+5:30
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्याची सक्त अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. सकाळपासून शहरात फिरून नगर परिषद ...
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. त्याची सक्त अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. सकाळपासून शहरात फिरून नगर परिषद व पोलिसांनी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्वच व्यवसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापारपेठ बंद झाल्याने शहरातील वर्दळ कमी होऊन सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला. कडक निर्बंधाचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गाला बसला. कापड दुकान, स्टेशनरी, हार्डवेअर, सराफ आदी व्यवसायात काम करणाऱ्या मजुरांना घरी बेकार बसण्याची वेळ आली आहे. हॉटेल, खानावळ, वडापाव, पानदुकानदार व खारमुरे विक्री करणारे हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा रोजगार बुडाला. सलून व्यवसायिक बंदमुळे हतबल झाले आहेत.
गतवर्षी आठ ते नऊ महिने बेकारी व उपासमारी सहन करणाऱ्या या छोट्या व्यावसायिकातून प्रशासनाने लादलेल्या कडक निर्बंधाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
----
हातावरचे पोट असणाऱ्यांना फटका
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या कडक निर्बंधाचा फटका रस्त्याच्या कडेला बसून माठ विक्री करणारे कुंभार, बूट पॉलिस करणारे गटई कामगार, देवी-देवतांच्या मूर्ती विक्री करणारे कारागीर, फुगे, खेळणी विक्री करणारे,सराफाच्या दुकानासमोर विणकाम करणाऱ्यांना बसला आहे. आता खायचे काय असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे.
-----
गेली आठ-नऊ महिने आमचे धंदे बंद होते. मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले आता कुठे सुरळीत धंदे सुरू झाले पण पुन्हा कोरोना संसर्ग वाढल्याने आमच्यावर दुकान बंद ठेवण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. आम्ही कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्व उपाययोजना करून सलून चा व्यवसाय करू पण आम्हाला आमचा धंदा सुरू करण्यास परवानगी द्या.
- दादा थोरात, सलून व्यावसायिक
-----
कोरोना संसर्गामुळे महिनाभर लादलेल्या कडक निर्बंधामुळे आमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामधंदा बंद पडल्याने खायचे काय आता शासनाने आमची उपासमारी टाळण्यासाठी रेशनवरील धान्य देण्याची व्यवस्था करावी.
- उमर मदारी, कष्टकरी कामगार.
----०६करमाळा ०१,०२
ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसलेला फळविक्रेता रेहमान बागवान.
कडक निर्बंधामुळे बच्चे कंपनी घराबाहेर पडत नसल्याने बुड्डी के बाल विक्रेता ग्राहकाच्या प्रतीक्षेत.