रात्रभर पायी प्रवास; सोलापूर बनले स्थलांतरित मजुरांचे जंक्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 03:23 PM2020-05-13T15:23:14+5:302020-05-13T15:26:43+5:30
सात राज्यांकडे जाण्याचा मार्ग; हजारो परप्रांतीयांचा निश्चय ‘डू आॅर डाय’
महेश कुलकर्णी
सोलापूर : टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो कि.मी. अंतरावरून भाकरीच्या शोधात आलेले लाखो परप्रांतीय कामगार आणि मजूर आज ‘कोरोना’च्या जीवघेण्या साथीला घाबरून आपापल्या गावी जाण्यासाठी मिळेल तो मार्ग स्वीकारत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणांहून निघालेले सात राज्यांतील हे मजूर सोलापूरमार्गे पायी आपापल्या राज्याकडे निघालेले आहेत. ‘डू आॅर डाय’ असा पक्का निश्चय करून या परप्रांतीयांचा तांडा हजारो मैल चालत निघाला आहे.
सोलापूर हे तीन राज्यांच्या सीमेवरचे शहर आहे. महाराष्टÑासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही राजे सोलापूरमुळे जोडली गेलेली आहेत. सोलापुरातून विजयपूरमार्गे कर्नाटक आणि तामिळनाडूकडे जाता येते. हैदराबादमार्गे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आणि केरळ तर तुळजापूर-औरंगाबादमार्गे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांना जोडणारे रस्ते आहेत.
मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या औद्योगिक नगरीत काम करणारे लाखो कामगार आणि मजूर जीवाच्या आकांताने आपल्या गावाकडे जायला निघाले आहेत. या परप्रांतीयांचे जत्थेच्या जत्थे सोलापूरच्या विजयपूर, हैदराबाद आणि तुळजापूर मार्गावर दिसत आहेत. राज्य सरकारने रेल्वे आणि एसटीची सुविधा उपलब्ध केल्याचे सांगूनही अनेक मजुरांनी अवैधरीत्या गाडीची सोय केलेली आहे. लांबचा प्रवास असल्याने आणि दोन-तीन राज्यांच्या सीमा पार करायच्या असल्याने वाहनधारक या मजुुरांकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करीत आहेत. एवढे करूनही एका गाडीत क्षमतेपेक्षा जास्त मजुरांना बसविल्यास कोरोना पसरण्याची मोठी भीती असतेच. स्वत:च्या जीवावर उदार होऊन या परप्रांतीय मजुरांनी आपल्या कुटुंबीयांकडे परत जाण्याचे ठरविले आहे.
एवढेच नव्हे तर ज्या मजुरांची प्रवासाची कुठलीही सोय नाही, असे मजूर चक्क पायी जात आहेत. हजारो कि.मी. कुटुंबकबिल्यासह पायी जाणाºया मजुरांच्या राहुट्या सोलापूरच्या महामार्गावर दिसत आहेत. दिवसभर रस्त्याच्या कडेला सावली बघून आराम आणि रात्रभर पायी प्रवास असा सध्या या मजुरांचा दिनक्रम आहे.
फाळणीसारखी स्थिती
- १९४७ साली भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर लाखो लोकांचे थवे भारतातील सर्वच प्रमुख मार्गांवरून स्थलांतरित होताना दिसत होते. अशाच प्रकारची स्थिती स्वातंत्र्यानंतर आता पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे. प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने मजूर आपल्या कुटुंबासह रस्त्यावरून जाताना दिसत आहेत.
सात राज्यांचे आठ लाख मजूर
- महाराष्टÑात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांतील मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या राज्यांमधील ८ लाखांच्या आसपास मजूर महाराष्टÑातील प्रमुख गावात काम करतात. हे सर्व मजूर सोलापूरमार्गे आपल्या राज्याकडे निघाल्याने सोलापूरच्या प्रमुख मार्गांवर रांगा दिसत आहेत.