Lok Sabha Election 2019; पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदारांविरुद्ध सोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 10:41 AM2019-03-12T10:41:45+5:302019-03-12T11:02:15+5:30
सोलापूर : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हमीयुक्त आश्वासने देऊन मानसिक छळ करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ...
सोलापूर : २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हमीयुक्त आश्वासने देऊन मानसिक छळ करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पवार (वय ३५, रा. ६६, धुम्मा वस्ती, लक्ष्मी पेठ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूरचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांच्याविरुद्ध आॅनलाईन तक्रार दिली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यास ही फिर्याद प्राप्त झाली.
मोदी यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून दि. ३ मार्च २०१४ रोजी शिवस्मारक, शिंदे चौक, सोलापूर येथे दहा हजार रुपये खर्च करून सभा घेतली. सभेत संविधानावर हात ठेवून मी व माझे छावा संघटनेचे पदाधिकारी व २०० ते २५० लोकांनी नरेंद्र मोदी व भाजपला मतदान करण्याची जाहीर शपथ घेतली. ९ एप्रिल २०१४ रोजीच्या होम मैदानावरील मोदी, फडणवीस यांच्या हमीयुक्त आश्वासन व निवडणूक जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून आम्ही १७ एप्रिल २०१४ रोजी भाजपला मतदान केले. सोलापुरातील उमेदवार शरद बनसोडे यांना निवडून आणले. परंतु त्यानंतर गेल्या पाच वर्षांत मोदी यांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. भारताचे जवळपास ५०० सैनिक शहीद झाले, तरी त्यांनी पाकिस्तानच्या सैनिकांना मारले नाही, त्यामुळे त्यांनी माझ्या देशप्रेमाचा विश्वासघात केला.
शेतकºयांना हमीभाव दिला नाही, काले धन भारतात आणले नाही, तसेच सबका साथ सबका विकासही केला नाही अन् अच्छे दिन ही दाखविले नाही. सोलापुरातील भाषणात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सोलापुरातील कापड उद्योजकांना चालना आणि धनगर समाजाला आरक्षणही दिले नाही. याउलट २०१४ च्या निवडणुकीवेळी दिलेली सर्व आश्वासने ही चुनावी जुमला होता, असे भाष्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले. त्यामुळे मला माझी फसवणूक झाल्याची खात्री झाली. त्यामुळे वरील आरोपींविरुद्ध माझी लेखी फिर्याद नोंदवून घेऊन त्यांच्यावर दखलपात्र स्वरूपाचा फौजदारी गुन्हा करावा, अशी तक्रार दिली आहे.
पंतप्रधानांच्या भूलथापांना बळी पडलो
- तक्रारीमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार मोदी यांनी भारतभर जाहीर प्रचार सभेत मते देण्यासाठी आश्वासक व हमीयुक्त भाषण करून आमचा विश्वास संपादन केला. मोदी यांनी शहीद होणाºया जवानांबाबत व सामान्य जनतेच्या देशप्रेमाचे भांडवल करून, ‘मेरा सिना ५६ इंच का है... हमारा एक जवान शहीद हुआ तो मैं पाकिस्तान के दस जवान को मारुंगा’, असे वक्तव्य करून भावनिक आवाहन करून माझा विश्वासघात केला. मोदी यांच्या काले धन, शेतीमालाला हमीभाव, सबका का साथ सबका विकास व अच्छे दिनच्या खोट्या प्रचारास व जाहिरातीच्या भूलथापांना बळी पडलो, असेही योगेश पवार यांनी नमूद केले आहे.