Lok Sabha Election 2019; उमेदवारांना द्यावा लागणार परदेशी मालमत्तेसह बँक खात्याचा तपशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 01:17 PM2019-03-13T13:17:43+5:302019-03-13T13:19:42+5:30
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाºया उमेदवारांना देशातील स्थावर व अस्थावर मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक आहे. याशिवाय ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाºया उमेदवारांना देशातील स्थावर व अस्थावर मालमत्तेचा तपशील देणे बंधनकारक आहे. याशिवाय परदेशातील मालमत्ता, बँक खात्याचा तपशील उमेदवारी अर्ज दाखल करताना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. मागील पाच वर्षांतील आयटी रिटर्नचा तपशीलही शपथपत्रात नमूद करणे आवश्यक करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पूर्वतयारी युध्दपातळीवर सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीपासून फॉर्म २६ नुसार एकाच प्रतिज्ञापत्रात उमेदवारांना आवश्यक माहिती देणे बंधनकारक केले आहे.
नव्या नियमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करतानाच उमेदवाराने त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे, प्रलंबित असणारे गुन्हे व खटले याविषयी माहिती देणे आवश्यक आहे. ही माहिती प्रसारमाध्यमातून किमान तीनदा उमेदवारांनीच प्रसिध्द करायची आहे.
कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती, नातेसंबंध, त्यांचा बँक तपशील, बँकेचे कर्ज, जमीन, बंगला, सोने, वाहने यासारख्या संपत्तीचा देशातील व परदेशातील तपशीलही देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पॅनकार्ड क्रमांक, परदेशातील गुंतवणूक, परदेशी कर्ज, परदेशातील ठेवी आदींचाही तपशील प्रतिज्ञापत्रात उमेदवारास नमूद करावा लागणार आहे.