राज्यात मराठा+मराठी 'राज'कारण?; मनसेशी मनोमीलनाबाबत शरद पवारांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 07:19 PM2019-02-09T19:19:42+5:302019-02-09T19:36:10+5:30
मोदीविरोधी महाआघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'इंजिन' जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात आहे.
'मिशन २०१९'मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी विरोधकांच्या महाआघाडीची मोट बांधली जातेय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे महागुरूंच्या भूमिकेत आहेत. या महाआघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'इंजिन' जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांना तीन जागांचा प्रस्ताव दिल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे मराठा + मराठी हे समीकरण जुळणार का, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. या संदर्भात शरद पवारांनी आज महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
राज ठाकरे यांना तरुणांचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असते. परंतु, निवडणूक समझोत्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा झालेली नाही आणि ती होईल असं दिसतही नाही, असा खुलासा शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना केला.
ईशान्य मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील दिंडोरी या तीन जागा मनसेसाठी सोडल्यास महाआघाडीमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी शरद पवारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. अलीकडच्या काळात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्यानं राष्ट्रवादीच्या घड्याळाला मनसेचे काटे जोडले जाऊ शकतात, अशी कुजबूजही ऐकू येत होती. अगदीच तीन नाही, पण दोन जागा मनसेला देऊन शरद पवार नवा मित्र जोडतील, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, आघाडीत मनसे नको, अशी काँग्रेसची भूमिका होती. ती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि अन्य नेते ती ठामपणे मांडत होते.
या पार्श्वभूमीवर, राज ठाकरेंना आघाडीत घेणार का, त्यांच्यासाठी जागा सोडणार का, याबाबत पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं. तेव्हा, या राष्ट्रवादी-मनसे मैत्रीच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.