शहाजीबापूंच्या सांगोला मतदारसंघात कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा, मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण
By Appasaheb.patil | Published: May 7, 2024 03:22 PM2024-05-07T15:22:13+5:302024-05-07T15:23:45+5:30
शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील महुद या गावात दुपारी मतदान केंद्राच्या बाहेर दोन गटात जोरदार राडा झाला.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील महुद या गावात दुपारी मतदान केंद्राच्या बाहेर दोन गटात जोरदार राडा झाला. या तुंबळ हाणामारीत शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण होते.
सांगोला तालुक्यात सकाळपासून सर्वच केंद्रावर सुरळीत मतदान सुरू झाले होते. दुपारनंतर सर्वच मतदान केंद्रावर उन्हातही रांगा लागल्या होत्या. त्यात महुद या गावामध्ये मतदान केंद्राबाहेर उभारलेल्या भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेकापाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. मतदान करण्यावरून किरकोळ वाद झाला. या वादातून तुफान हाणामारी सुरू झाली. त्यामुळे काही वेळ मतदान केंद्राबाहेर प्रचंड गोंधळ उडाला होता. पोलिसांनी या वादावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, अतिरिक्त पोलीस यंत्रणा पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले. मात्र या घटनेत शेकापाचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. अद्यापपर्यंत पोलीस ठाण्यात काेणतेही नोंद झाली नाही. त्यामुळे नेमकी घटना कशामुळे घडली याची माहिती समोर आली नाही.