लोकसभेची निवडणूक जातीवर जाणार; पालकमंत्र्यांनी व्यक्त केली भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 10:10 AM2019-04-01T10:10:51+5:302019-04-01T10:13:20+5:30
महायुतीचे प्रचार कार्यालय मेकॅनिक चौकातील टाईम स्क्वेअरमध्ये सुरू करण्यात आले.
सोलापूर : लोकसभेची निवडणूक भाजपसाठी सोपी नाही. ही निवडणूक जातीवर जाते की काय, अशी भीती आम्हाला वाटत आहे, अशी शंका पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली.
महायुतीचे प्रचार कार्यालय मेकॅनिक चौकातील टाईम स्क्वेअरमध्ये सुरू करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी त्याचे उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, महापौर शोभा बनशेट्टी, शिखर बँकेचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य अविनाश महागावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर, जिल्हा संपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले, किशोर देशपांडे, विक्रम देशमुख, श्रीमंत बंडगर आदी उपस्थित होते.
महेश कोठे म्हणाले, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. गाफील राहिले की धोका झालाच म्हणून समजा.
नगरसेवकांच्या अनुपस्थितीवरुन नाराजी
मध्यवर्ती कार्यालयात सकाळच्या सत्रात भाजपचे संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांनी भाजपच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला भाजपच्या ५१ नगरसेवकांपैकी २० नगरसेवक हजर होते. यावरुनही बैठकीत खसखस पिकली. जे अनुपस्थित आहेत, अशा सर्व नगरसेवकांच्या घरी जाऊन मी त्यांची भेट घेणार आहे, अशा शब्दात भाजपचे सहनिवडणूक प्रमुख किशोर देशपांडे यांनी नाराजी व्यक्त केली. सायंकाळी झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे काही मोजके नगरसेवक उपस्थित होते. शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांना या कार्यक्रमाची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.