‘लोकमान्य’ देतोय शाडूच्या मूर्तींना लोकमान्यता; किरीटेश्वर मंडळाचेही ‘डोअर टू डोअर’ जनजागरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:14 PM2020-08-18T12:14:35+5:302020-08-18T12:16:48+5:30
सोलापूर ‘लोकमत’च्या चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद; सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचे सोलापूरकरांना आवाहन
सोलापूर : पर्यावरण रक्षणासाठी शाडूच्या गणेशमूर्ती ही काळाची गरज बनली आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी ‘लोकमत’च्या ‘घरोघरी शाडूच्या मूर्ती’ या संकल्पनेचे सर्वस्तरातून स्वागत होत असताना लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मंडळ शाडूच्या गणेश मूर्तींना लोकमान्यता मिळवून देण्यावर भर देत आहे. कुंभार वेस येथील श्री किरीटेश्वर तरुण मंडळ ‘डोअर टू डोअर’ जनजागरण करत आहे.
यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे मोठे संकट आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी शहरातील सार्वजनिक मध्यवर्ती मंडळांनी प्रतिष्ठापना अन् गणेश विसर्जन मिरवणुका न काढण्याचा निर्णय घेतला आहे.
मूर्तिकारांकडेही या मूर्तींची मागणी वाढतेय !
सोलापुरातील विविध भागांमध्ये गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल्स उभे केले जातात. यंदा कोरोनामुळे स्टॉल्स टाकण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे घरातच अथवा स्वत:च्या दुकानांमध्ये गणेश मूर्ती विक्री करता येणार आहे. ‘लोकमत’च्या ‘घरोघरी शाडूच्या मूर्ती’ या संकल्पनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून काही मूर्तिकार प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी शाडूच्या मूर्ती बनवण्यावर भर दिला आहे. काही गणेशभक्तही शाडूच्या मूर्ती मागवा, असा सूरही आळवत आहेत.
तरच कोरोनाची साखळी तुटेल- घाडगे
विसर्जनानंतर नदी, तलाव अन् विहिरींच्या पाण्यात गणेश मूर्तींच्या विटंबनेचे प्रकार दिसून येतात. ‘लोकमत’च्या संकल्पनेनुसार शाडूच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली तर अशा मूर्तींचे घरातच विसर्जन करता येणार आहे. ‘लोकमान्य’ संयुक्त गणेशोत्सव मंडळ शाडूच्या गणेश मूर्तींना लोकमान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करील, असे मंडळाचे प्रमुख सल्लागार श्रीकांत घाडगे यांनी सांगितले.
खरे म्हणजे कोरोनापासून खूप काही शिकायला मिळाले. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी न करण्याची शपथ घेतली पाहिजे. उत्सवातील गर्दी टाळण्यासाठी घरच्या घरीच शाडूच्या गणेश मूर्र्तींची प्रतिष्ठापना करा अन् घरातच विसर्जन करा. ‘लोकमत’ची ही संकल्पना खूप आवडली. लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव नक्कीच याबाबत जनजागरण करेल.
-महेश गादेकर,
प्रमुख सल्लागार- लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळ.
जलप्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापना अन् घरातच विसर्जन करण्याची संधी मिळाली आहे. कोरोनामुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी शाडूच्या मूर्ती हाच एकमेव पर्याय आहे.
-अशोक कोळेकर,
मार्गदर्शक,
श्री किरीटेश्वर तरुण मंडळ.
यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणेशोत्सवातील गर्दी टाळण्यासाठी जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ‘लोकमत’ने घेतलेली भूमिका योग्यच आहे.
-नागेश हिंगमिरे,
अध्यक्ष,
श्री किरीटेश्वर तरुण मंडळ.
बाप्पा म्हणजे संकटमोचक. सध्या कोरोनाचे हे संकट बाप्पाच दूर करतील. त्यासाठी प्रत्येकाने घरोघरी शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना अन् घरीच विसर्जन केले तर कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.
-प्रकाश ढवळे,
अध्यक्ष- लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळ.