‘लोकमत’ बांधावर; पंढरपूर तालुक्यातील बळीराजावर अस्मानी संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 03:09 PM2019-11-06T15:09:11+5:302019-11-06T15:11:21+5:30
नशीब फुटलं.. खरबूज बुजलं..; कोर्टी येथे दोन एकरावरील पीक अतिपावसामुळे झाले खराब
सतीश बागल
पंढरपूर : ऐन पावसाळ्यात तीन महिने पाऊस नाही.. उजनी धरण भरलेलं असल्यानं कांदा, फळपिके घेतली. जेमतेम पाण्यावर उसाची लागवड केली. मात्र, परतीच्या पावसानं फटका दिला अन् होत्याचं नव्हतं झालं. कांदा शेतातच सडू लागला... जो त्यातून बचावला त्यावर करप्या रोगानं पछाडलं. या परतीच्या पावसानं शेतकºयांच्या साºया मेहनतीवर पाणी फिरवलं.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी धर्मा शंकर येडगे यांचा १२ सप्टेंबरला लागवड केलेला दोन एकर खरबुजाचा प्लॉट माल पक्वतेच्या अवस्थेत होता. मल्चिंग पेपर, सुरक्षेसाठी प्लॉटभोवती जाळी, दोन रुपयाला एकप्रमाणे रोप खरेदी केलेले. एकूण सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आलेला होता. दि. २० आॅक्टोबर रोजी रात्री अचानक पाऊस झाला. दुसºया दिवशी कडक ऊन पडले. वातावरणात बदल झाला. खरबुजावर रोग पडण्यास सुरुवात झाली.
दहा दिवसांत प्लॉट हातचा गेला. एक रुपयाचेही उत्पन्न हाती आले नाही. केलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न येडगे यांच्यासमोर आहे. कृषी सहायक, तलाठी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. परंतु गेल्या वर्षी बाधित शेतकºयांना अद्याप मदत मिळाली नसल्याचे सांगत त्यांनी वेळेत मदतीची अपेक्षा व्यक्त केली.
उपरी (ता. पंढरपूर) येथील शिवाजी मारुती नागणे यांनी दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली आहे. सततच्या पावसामुळे कांदा पिवळा पडला आहे. करप्याने प्लॉट वेढला असून, फवारणी करूनही पीक हाती येईल का, याची शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले. भंडीशेगाव हद्दीतील शेतात अडीच एकर ऊस लागवड केली आहे. पावसाचे पाणी साचून राहिल्याने उसाचे डोळे नासून गेले आहेत. त्या ठिकाणी पुन्हा लागवड करावी लागणार असल्याचे नागणे यांनी सांगितलं.
ऊस लागवडीसाठी केलेल्या सुमारे ५० हजार रुपयांचा खर्च वाया गेला असल्याचे सांगितले. त्या शेजारी असणाºया नितीन बागल यांच्या शेतात काढून ठेवण्यात आलेले सोयाबीन सततच्या पावसामुळे खराब झाले आहे. आहे त्या अवस्थेत शेतात टाकून द्यावे लागले आहे. सध्या शेतात पाणी असून, रब्बी हंगामातील पीक लागवडीसाठी मशागत कधी करणार, शेताला वाफसा कधी येणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च यासाठी करण्यात आलेला होता.
होत्याचं नव्हतं झालं.. लवकर मदत मिळावी
- ऐन पावसाळ्यात पावसाने उगडीप दिल्याने दुसºयाच्या पाईपलाईनने उजनी कालव्यातून पाणी आणून सोयाबीन जतन केले. महिला मजुरांकडून खुरपणी करण्यात आली. मात्र, परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. शासनाकडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शासनाकडून लवकर आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा भंडीशेगावच्या नितीन बागल, धर्मा येडगे, शिवाजी नागणे यांच्यासह अनेक शेतकºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.