‘लोकमत’ बांधावर; मक्याला आली आता बुरशी...क़णसाला आले मोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 02:59 PM2019-11-07T14:59:41+5:302019-11-07T15:02:16+5:30
सुस्ते परिसरातील शेतकरी संकटात; लाख रुपयांच्या मेहनतानाचा चुराडा; शेतात अन् बळीराजाच्या डोळ्यांतही पाणी
अंबादास वायदंडे
सुस्ते : चार महिने जिवापाड जपलेल्या मकेच्या पिकाला पंधरा दिवसांत परतीच्या पावसानं घेरलं आणि होत्याचं नव्हतं झालं. उसाला जादा पाणी लागतं म्हणून तीन एकरात मका लावण्याचा निर्णय घेतला. पण कशाचं काय? संघर्ष आमच्या पाचवीला पुजलाय. त्याला कोण काय करणार? असा हताश सूर सुस्ते (ता. पंढरपूर)च्या हिंदुराव अडसुळ यांनी शेतातल्या बांधावर पोहोचलेल्या ‘लोकमत’च्या चमूशी बोलताना व्यक्त केला.
भकास चेहºयानं आपली व्यथा मांडताना हिंदुराव अडसुळ म्हणाले.. चार महिन्यांपूर्वी मेहनतीसह एक लाख रुपये खर्च करून अॅडव्हान्टा ९२:९६ या जातीच्या मकेची लागवड केली. कमी पाणी असल्याने रात्रीचा दिवस करून मकेला काटकसरीने पाणी दिले. लष्करी अळींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्या होत्या. मकेच्या पिकाला नजर लागेल, असे पीक शेतात आले होते. पिकाचे पूर्ण दिवस झाल्यानंतर कणसांची काढणी सुरू होती. मकेच्या ताटाची कणसेही मोडून शेतात जागोजागी टाकली होती. पण कणसे शेतातून उचलण्याअगोदरच परतीच्या पावसाने जोर धरला. शेतात सगळीकडे पाणीच पाणी झाले. डबडबल्या डोळ्यांनी हिंदुरावांनी आपलं गाºहाणं मांडलं.
परतीच्या पावसानं कणसं शेताच्या बाहेर काढण्यासाठीसुद्धा सवड दिली नाही. आता मका कणसे पाण्यात असल्याने काळी पडून त्याला बुरशी लागली आहे, तर काही कणसांना मोड आले आहेत. कणसं शेतातील पाण्यात असल्याने चार महिने कष्ट करूनसुद्धा मकेची कणसं पूर्ण पाण्यात असल्याने ते बघण्याशिवाय काहीही करता येत नसल्याची खंत हिंदुराव अडसुळ यांनी व्यक्त केली.
मकेच्या पिकापासून १०० ते १२५ क्विंटल उत्पन्न अपेक्षित होते. मात्र परतीच्या पावसात सापडल्याने कणसं पूर्ण काळी पडली, बुरशी लागली व कणसाला मोड आले आहेत. त्यामुळे ७० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. आजच्या बाजार भावाप्रमाणे ३ लाख रुपयांचे उत्पन्न निघण्याची हमी होती. परंतु अवकाळी पावसाने जोर धरल्याने मकेच्या पिकाला खर्च केला तेवढासुद्धा निघत नसल्याचे अडसुळ यांनी सांगितले. परतीच्या पावसाने सुस्ते परिसरात फळबागेचे व इतर पिकांचे नुससान झालेल्या पिकांचे शासनामार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावेळी अडसुळ यांच्या मकेच्या शेतात पंचनामे करण्यासाठी कृषी सहायक राहुल मोरे, तलाठी प्रकाश गुजरे, ग्रामसेवक विष्णू गवळी, हनुमंत कवळे, कोतवाल दिगंबर बंगाळे, बिभीषण पाटील आदी उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने सर्रास शेतकºयांनी मका, कांदा, फळबाग व इतर पिकांची लागवड केली. यावर्षी पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटून गेले तरी एकही पाऊस झाला नव्हता. कमी पाण्यावर जगवलेली पिके परतीच्या पावसाने पूर्ण नष्ट झाली आहेत. या अवकाळीत आम्हा शेतकºयांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी.
- हिंदुराव अडसुळ
मका उत्पादक शेतकरी, सुस्ते