‘लोकमत’ बांधावर; झाडे करपली, टोमॅटो नासले; उरले केवळ बांबू अन् दोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 02:53 PM2019-11-07T14:53:19+5:302019-11-07T14:56:19+5:30
मोडनिंब परिसरातील स्थिती : कांद्याच्या पाती जळून वाढ खुंटली, शेतकरी संकटात
मारुती वाघ
मोडनिंब : सध्या सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. मोडनिंब (ता़ माढा) परिसरातील पोपट पावणे या शेतकºयाच्या शेतात जाऊन पाहणी केली असता टोमॅटोच्या फडातील सर्व झाडे करपली होती, टोमॅटो नासले होते, परिणामी केवळ उभे बांबू आणि दोरीच दिसून आली.
मोडनिंबसह परिसरातील अरण, जाधववाडी, बैरागवाडी या भागात कमी पाऊस झाला असला तरी या पावसाने शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले़ विशेषत: कांदा, टोमॅटो, ज्वारी, सिमला मिरची याचे नुकसान झाले आहे.
सध्या पाऊस थांबला असला तरी रोजच धुके पडत आहे़ खराब हवामान यामुळे कांदा, टोमॅटो या पिकावर करपा नावाचा रोग पडला आहे़ शेतात सर्वत्र पाणी वरून करपा रोग यामुळे पिके जागीच जळून जात आहेत़ झाडांना फांद्याशिवाय एक पान राहिलेले दिसत नाही़ कांदा पिकाच्या पाती पूर्णपणे जळून गेल्यामुळे त्याची वाढ थांबलेली आहे, असे माऊली हागे या शेतकºयाने सांगितले.
अरण शिवारातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या पिकाची पाहणी केली असता दिलीप सोलंकर, विष्णू सोलंकर, शिवाजी इंगळे, नवनाथ इंगळे, राजू इंगळे हे शेतकरी म्हणाले, आम्ही अतिशय कष्टाने लावलेला व जोमदार आलेला कांदा केवळ खराब हवामान, धोक्यामुळे व रिमझिम पावसामुळे जागेवरच पिवळा झाला आहे़ परिणामी आता त्याची वाढ थांबली़ यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.
द्राक्ष बागायतदार बबन वाघमारे म्हणाले, सध्या ढगाळ वातावरण आणि धुके पडून रोगराई पसरत आहे; मात्र बागेमध्ये सगळीकडे पाणीच असल्याने फवारणी करता येत नाही़ त्यामुळे नुकसान होत आहे.
तरी प्रशासनाने मोडनिंब,अरण, जाधववाडी, बैरागवाडी, तुळशी, सोलंकरवाडी, बावी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
पावसानं बुडाले अडीच लाख
- मोडनिंब येथील शेतकरी पोपट पावणे म्हणाले, जमिनीची मशागत, शेणखत लागवड, खते, फवारणी, बांबू व तारा मजुरी यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च झाला़ आतापर्यंत ३ लाख रुपये उत्पादन मिळाले आहे़ अजून दोन ते अडीच लाख रुपये उत्पादन अपेक्षित होते; मात्र रिमझिम पाऊस व हवामान बदलामुळे धुके पडून टोमॅटोचे नुकसान झाले़ तसेच त्यांच्या शेजारील माऊली हागे, विजय वाघ याही शेतकºयांची करपा रोगाने पूर्णपणे झाडे जळून नुकसान झाले आहे़