लोकमत Impact: नाल्यात सोडणारे केमिकलमिश्रित दूषित पाणी बंद होणार

By Appasaheb.patil | Published: December 22, 2022 02:17 PM2022-12-22T14:17:28+5:302022-12-22T14:17:49+5:30

महापालिका प्रदूषण महामंडळाला कारवाईसाठी पत्र लिहिणार, नागरिकांसोबतच लोकप्रतिनिधींनी केल्या आयुक्तांकडे तक्रारी

Lokmat Impact: Chemically contaminated water discharged into drains will be stopped in Solapur | लोकमत Impact: नाल्यात सोडणारे केमिकलमिश्रित दूषित पाणी बंद होणार

लोकमत Impact: नाल्यात सोडणारे केमिकलमिश्रित दूषित पाणी बंद होणार

googlenewsNext

सोलापूर : कारखान्यातून सोडण्यात येणारे केमिकलमिश्रित दूूषित पाणी नाल्याद्वारे सोडण्यात येत असल्याने विडी घरकुल परिसरातील अनेक नगरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच अनेक नागरिक, तसेच लोकप्रतिनिधींनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेत तक्रारी केल्या, निवेदने दिली. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित दूषित पाणी नाल्यात सोडणाऱ्या कारखान्यावर कारवाई करावी, यासाठी महापालिकेच्यावतीने प्रदूषण नियंत्रण महामंडळ व एमआयडीसीच्या प्रमुखांना पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.

हैदराबाद रस्त्यावरील विडी घरकुलाच्या अनेक भागात केमिकलच्या हिरव्या पाण्यामुळे प्रचंड भीती पसरली असून, येथील रहिवासी रस्त्यावर येऊन स्वत:ला होत असलेल्या त्रासाबद्दल पोटतिडकीने बोलत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अक्कलकोट एम.आय.डी.सी.च्या कारखान्यामधून सोडले जाणारे सांडपाणी हे अक्कलकाेट रस्त्यावरील गांधीनगर, मुद्रासन सिटी, धनलक्ष्मी नगर, विडी घरकुल, युनिट टाऊन, ई.एफ.एच.जी.ग्रुप व प्रियदर्शनी नगर, संग्राम नगर या भागातून ओपन नाल्याद्वारे केमिकलमिश्रित दूषित सांडपाणी नाल्याद्वारे वाहत आहे. या केमिकलच्या दुर्गंध वासामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना, लहान मुलांना व इतर वयोवृद्ध नागरिकांना डोळ्यांचा त्रास, श्वसनाचा त्रास, डोके, अंग दुखणे, खोकला, सर्दी, मळमळ, आदी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

माजी नगरसेवक कोठे, कोटा महापालिकेत...
गेल्यावर्षी अक्कलकोट रोड मुद्रासन सिटी समोरील चेंबरमध्ये काम करीत असताना चार निष्पाप कर्मचाऱ्यांचा याच केमिकलच्या पाण्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला तरी पण महापालिकेकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे कायदेशीर कारवाई केली नाही. तरी आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन करण्यात येणार असा इशारा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे व विठ्ठल कोटा यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दूषित पाण्यासंदर्भातील तक्रारी संदर्भात गुरुवारी त्या भागातील लोकप्रतिनिधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, तसेच एमआयडीच्या प्रमुख अधिकाऱ्यांना भेटून तक्रारी देत निवेदन देणार आहे, याबाबतची माहिती माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी दिली.

दूषित पाण्यासंदर्भातील विषय हा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा आहे. शिवाय एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. शिवाय नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नासंदर्भातील मुद्दा व महापालिकेकडे आलेल्या तक्रारी, निवेदनाचा विचार करता आम्ही प्रदूषण महामंडळ व एमआयडीसीला संबंधित कारखान्यांवर कारवाई करावी याबाबत पत्र देणार आहोत.- शीतल तेली-उगले, आयुक्त, मनपा.

Web Title: Lokmat Impact: Chemically contaminated water discharged into drains will be stopped in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.