‘लोकमत’इनिशिएटिव्ह; शाडूच्या गोळ्याला आकार देत लीलया साकारली गणेश मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 02:39 PM2020-08-17T14:39:42+5:302020-08-17T14:42:23+5:30
सोशल मीडियावर लाईव्ह प्रात्यक्षिक; हजारो सोलापूरकरांनी नोंदविला आॅनलाईन सहभाग
सोलापूर : शाडू मध्यम अन् घट्ट स्वरुपात मळून घेतल्यानंतर विघ्नहर्त्या गणरायाची मूर्ती साकारण्यास कलाशिक्षक विकास गोसावी यांनी प्रारंभ केला...हे सारं सोशल मीडियावर लाईव्ह होतं. हजारो सोलापूरकर लाईक, शेअर अन् कमेंट करत ‘लोकमत’च्या ‘शाडूच्या गणेशमूर्ती घरोघरी’ या उपक्रमांतर्गत आयोजित केलेले प्रात्यक्षिक पाहण्यात गर्क झाले. अतिशय सुंदर निवेदन करत गोसावी यांनी ‘श्री’ मूर्तीचा चेहरा, सोंड, आशीर्वादासाठी पुढे आले अन् आयुधं धारण केलेले हात शिवाय अन्य अवयव लीलया तयार करत गणरायाची मूर्ती साकारली.
होटगी रोडवरील लोकमत भवनात रविवारी सकाळी या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणप्रेमी कलाशिक्षक विकास गोसावी यांनी शाडूच्या गणेश मूर्तीबद्दल शास्त्रशुद्ध तसेच तांत्रिक माहिती देत जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. सोबत गणेश महिमा देखील त्यांनी सांगितला. यावेळी फेसबुक लाईव्हवर हजारो लोकांकडून लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या. ‘शाडूच्या गणेशमूर्ती घरोघरी’ समाजाभिमुख उपक्रमाद्वारे ‘लोकमत’ने इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सोलापूरकरांना केले.
मागील महिनाभरापासून इको फ्रेंडली मूर्तिकार, गणेश भक्तांच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती प्रसिद्ध केली. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने इको-फ्रेंडली शाडूच्या गणेशमूर्ती बनविण्यासंदर्भात फेसबुक लाईव्हद्वारे प्रशिक्षण दिले. ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक होत आहे. यंदा दहा हजारांहून अधिक घरांमध्ये शाडूच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. अनेक संस्था संघटना तसेच मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांनी देखील ‘लोकमत’च्या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.
अशी तयार करा मूर्ती
माती तयार करण्यासाठी प्रथम ताटामध्ये किंवा प्लास्टिक पेपरवर मातीमध्ये पाणी घालून माती मध्यम-घट्ट मळून घ्यावी. जेणेकरून मातीमध्ये बारीक किंवा छोटे खडे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. गणपती माती तयार झाल्यानंतर गणपती मूर्ती सुरू करताना सर्वप्रथम पाट, चौरंग बनवून घ्यावा. त्याच्यानंतर पाय, कमरेचा भाग, पोटाचा भाग, खांदे, हात आणि मस्तक तयार करून एकेक पार्ट एकमेकांना जोडावेत. हे पार्ट जोडत असताना पाण्याचा वापर कमीत कमी असावा. जास्त पाणी लावल्यामुळे त्याला तडे जाऊ शकतात. गणपतीचा बेसिक आकार झाल्यानंतर बोटाने किंवा अंगठ्याने त्याच्यावर जे उठावदार भाग आहेत त्यांना फाईन करून घ्यावं.
श्रमिकांची मुलंही रमली मूर्ती तयार करण्यात
लोकमत आयोजित शाडूच्या गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत पूर्व भागातील श्रमिकांच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विडी-यंत्रमाग कामगारांच्या मुलांनी त्यांच्या हस्तकलेचा उत्तम नमुना या कार्यशाळेत सादर केला. अत्यंत सुंदर व आकर्षक अशा गणेश मूर्ती बनवून त्यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर सादर केले. शुभम बंदलगी, कृष्णवेणी गजेली, कस्तुरी सपार, गायत्री श्रीराम, धनश्री कोल्हापुरे, सौंदर्या श्रीराम, रोशनी श्रीराम या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. शाळेतील शिक्षक शिवानंद हिरेमठ, कालिदास चवडेकर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भारत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष हारुण पठाण तसेच सचिव आसिफ पठाण उपस्थित होते.