Lokmat Initiative ; सोलापूरकरांना बारा महिने ‘व्हायरल इन्फेक्शन’ होण्यामागे रस्त्यावरचा कचरा हेच प्रमुख कारण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:00 PM2018-12-22T13:00:00+5:302018-12-22T13:03:30+5:30
आरोग्य अधिकाºयांनी सांगितले धोके : दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू
सोलापूर : शहराच्या विविध भागातील कचराफेकूंची माहिती स्मार्ट महिला सांगू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने कचराफेकूंवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. शुक्रवारी हेल्मेट विक्रेत्यांसह शिवाजी चौकातील व्यापाºयांना दंड आकारण्यात आला. कचराफेकूंचा बंदोबस्त करण्यासाठी स्मार्ट महिलांसोबत आता नगरसेवकही सरसावले आहेत.
शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया मंडळींची पोलखोल करण्याचे काम शहरातील स्मार्ट महिला ‘लोकमत’च्या माध्यमातून करीत आहेत. यानंतर महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी शिवाजी चौक परिसरातील विक्रेते, विजापूर रोडवरील हेल्मेट विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. पुढील दोन दिवसांत आणखी दंडात्मक कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील स्मार्ट महिलांनी शुक्रवारी आणखी काही ठिकाणांची माहिती पाठविली आहे. यामध्ये पाथरुड चौकातील कोपरा, अंत्रोळीकर नगर येथील सिंधी सत्संग भवन, छत्रपती शिवाजी चौकातील गणेश लॉज परिसर, अक्कलकोट रोड येथील प्लॉट नं. ९४, एनजी मिल कंपाउंडच्या समोर, वाडिया हॉस्पिटलच्या मागील नाला, रेल्वे स्टेशन भाजी मार्केट, विजापूर रोडवरील वृंदावन सोसायटी, तेलंगी पाच्छापेठ येथील मुख्य रस्ता, केगाव रोड, कल्याण नगर भाग १, सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागे लालबहादूर शास्त्री शाळेसमोर, नूतन प्रशालेच्या बाजूला शिमला नगरच्या मागे रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. या भागात महापालिकेच्या अधिकाºयांनी जाऊन कारवाई करावी, अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली आहे.
नागरिक, नगरसेवक म्हणाले, यांच्यावर कारवाई करा
होटगी रोडवर गुरूनानक नगर परिसरात राजेशकुमार नगरचे रहिवासी रस्त्यावर कचरा टाकतात. घंटागाडी येत असूनही त्यांना रस्त्यावर कचरा टाकायची सवय आहे. एकदा त्यांना दंड बसला पाहिजे. त्यांच्या शेजारच्या कॉलनीत कचरा घंटागाडीतच टाकला जातो. तेव्हापासून डुक्कर, गाढव हे प्राणी बंद झाले आहेत.
- अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार
जागोजागी रस्त्यावर ट्रॉली उभा करून कांदे विकतात. दिवसभराचा कांद्याचा कचरा तिथेच फेकून जातात. वॉटरफं्रट समोर असं चित्र दिसतं. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. कुणाचंच लक्ष नसतं. फळविक्रेते छत्रपती संभाजी तलावाजवळ बसून गोळा होणारा कचरा तेथेच टाकतात.
- कीर्ती जिरगे,
रहिवासी, श्रीकांत नगर.
जुळे सोलापुरातील सुधा इडलीगृह आणि सुप्रजा पावभाजी या दोन हॉटेलमधील कचरा रस्त्यावर असतो. अधिकाºयांना सांगूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. नगरसेवक राजेश काळे, प्रभागातील स्मार्ट महिला आणि भाजपाचे पदाधिकारी भारती विद्यापीठ चौक ते आसरा चौक हे रस्ते स्वच्छ असावेत यासाठी काम करणार आहोत.
- मनीषा हुच्चे, नगरसेविका