लोकमत इनिशिएटिव्ह ; सोलापूरचा पैसा पुण्यात खळखळतोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:06 PM2018-09-27T12:06:19+5:302018-09-27T12:10:25+5:30

अशी ही बाजारपेठेची कहाणी : इथला गल्ला आता रिकामाच खुळखुळतोय!

Lokmat Initiative; Solapur's money in Pune! | लोकमत इनिशिएटिव्ह ; सोलापूरचा पैसा पुण्यात खळखळतोय !

लोकमत इनिशिएटिव्ह ; सोलापूरचा पैसा पुण्यात खळखळतोय !

Next
ठळक मुद्देसराफ कट्ट्यातल्या दागिन्यांचा मोह लगतच्या कर्नाटकालाहीपुण्याची बाजारपेठ सोलापूरकरांना खुणावू लागलीयसोलापुरात कमविलेला पैसा तिथल्या गल्ल्यात भरण्यासाठी

सोलापूर : चाळीस लाख लोकसंख्या असलेला सोलापूर तसा महाराष्टÑातल्या प्रमुख जिल्ह्यांपैकी एक. राज्याच्या विकासाची दिशा ठरविण्याची ताकद बाळगणारा. तरीही हा जिल्हा अलीकडं खालच्या क्रमांकावर घसरला... कारण विकासाचा वेग आपल्याला टिकविताच आला नाही. बाहेरचा पैसा इथं खेचून आणणं तर सोडाच; इथला पैसाही इथंच खेळविता आला नाही. ‘वन डे ट्रीप’च्या नावाखाली आपल्या घामाचा पैसा पुण्याच्या बाजारपेठेत उधळण्यात सोलापूरकर रमला. म्हणूनच इथला पैसा पुण्यात खळखळला... सोलापूरचा गल्ला मात्र रिकामाच खुळखुळला.

एकेकाळी इथल्या गिरण्यांमधून सोन्याचा धूर निघायचा. आशिया खंडाच्या बाजारपेठेला इथला माल खुणवायचा. पण आज काय? गिरण्या उद्ध्वस्त. चिमण्या गायब, चाळी भकास. तरीही गेल्या चार-पाच दशकांमध्ये नवनव्या उद्योजकांनी सोलापूरची शान जपलेली. इथल्या रेडिमेड व्यवसायाची कॉपी इतर शहरांनी केलेली. चाटी गल्लीतल्या बस्त्यासाठी मराठवाड्यातली गर्दी इथं आलेली. सराफ कट्ट्यातल्या दागिन्यांचा मोह लगतच्या कर्नाटकालाही झालेला. बार्शीच्या भांड्यांसाठी पुण्याकडचीही मंडळी जमलेली.

मात्र गेल्या आठ-दहा वर्षांपासून सोलापुरात वेगळंच घडू लागलंय. पुण्याची बाजारपेठ सोलापूरकरांना खुणावू लागलीय. आपल्या खिशातला पैसा परजिल्ह्यात ओतण्याची नवी संस्कृती उदयास आलीय. दोन बायका जेव्हा एकमेकींना भेटतात तेव्हा त्यांच्या तोंडी हाच डॉयलॉग चर्चिला जाऊ लागलाय. ‘अगंऽऽ कालच्या रविवारी नां आम्ही दोघं लक्ष्मी रोडवर शॉपिंग केली बघऽऽ चांगल्या पंधरा हजारांच्या डिझायनर साड्या घेतल्या मी. पिंट्यालाही शूज तिथनंच घेतले... पिंकीचाही ड्रेस डिस्काऊंटमध्ये मिळाला हंऽऽ’ हे सांगत असताना दुसरीचीही सुरू होते चुळबुळ, पुण्याला जाण्यासाठी. सोलापुरात कमविलेला पैसा तिथल्या गल्ल्यात भरण्यासाठी. पण या दोघींना हे एक कळत नाही की, फॅमिलीचा जाण्या-येण्याचा खर्च किती? तिथल्या दिवसभरातला खाण्या-पिण्याचा खर्च किती?

वाजवा रेऽऽ वाजवा... 
- परमुलखातल्या ब्रॅन्डेड कंपन्यांचा ट्रेन्ड मिरविणाºया कितीतरी मंडळींना हेही माहीत नाही की, हे कपडे मुळात तयार होतात सोलापुरातच. केवळ ब्रॅन्डचा शिक्का मारून विकले जातात मुंबई-पुण्यात... अन् आम्ही हुश्शाऽऽर सोलापूरकरही दोन-तीन हजार रुपये प्रवासात खर्चून जातो तिथं खरेदीला... तिथून आणतो मोठ्या फुशारक्या मारत ब्रॅन्डेड वस्तू; ज्या की मुळात तयार झालेल्या असतात सोलापुरातच. वाजवा रेऽऽ वाजवा... सोलापूरकरांच्या स्वाभिमानाला दाद देणाºया टाळ्या वाजवा.

सोलापूरच्या वस्तूंचा परगावात व्यवसाय
- याच महाराष्टÑातली अशी कितीतरी शहरं आहेत की जी स्वत:च्या ब्रॅन्डला जपतात. स्वत:च्या बाजारपेठेचं अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडतात, संघर्ष करतात. कोल्हापूरवाल्यांनी भेळेपासून मिसळीपर्यंत... चपलीपासून फेट्यापर्यंत स्वत:चं वेगळं ‘इमेज ब्रॅन्डिंग’ केलंय. प्रत्येक वस्तू आपल्याच गावात घेण्यासाठी प्रत्येकानं जणू न सांगता विडा उचललाय... अन् इथं सोलापूरकरांचं काय? घरात जेवतानाही पुणेरी चक्क्याचं कौतुक. बेडवर झोपतानाही पुणेरी बेडशीटचंच अप्रूप. अरेऽऽ काय चाललंय तरी काय? तिथल्या बाजारपेठेत सोलापुरी चादरीची जाहिरात करून व्यापारी बक्कळ पैसा कमवितोय... अन् आम्ही हुश्शाऽऽर बापुडे तीच चादर घेऊन मोठ्या रुबाबात परत येतोय, लोकांमध्ये मिरवायला पुण्याचं शॉपिंग म्हणून... हाच तो सोलापुरी स्वाभिमान.

तुम्हीच ठरवा आता...
सांगा सोलापूरकरहोऽऽ सांगा... अशानं कसं होणार सोलापूरचा विकास? कारण, बाजारपेठेत पैसा खेळला तरच गावच्या विकासाला मिळते दिशा. तुम्हीच ठरवा आता... यापुढं आपली खरेदी परजिल्ह्यात की आपल्या सोलापुरात...!

Web Title: Lokmat Initiative; Solapur's money in Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.