लोकमत इनिशिएटिव्ह; रस्त्यावरचा कचरा दाखवू लागल्या महिला; कचराफेकू व्यापाºयांना बसू लागला दंड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 02:32 PM2018-12-21T14:32:25+5:302018-12-21T14:38:30+5:30
फूल विक्रेत्यांवर कारवाई : आयुक्तांच्या रडारवर आता शहरातील हॉटेलचालक आणि चायनीज गाडीवाले
सोलापूर : झोपडपट्ट्यांमधील कचरा घंटागाडीत जातोय... पण दुकानदार, व्यापारी रस्त्यावर कचरा टाकत असल्याचा प्रकार शहरातील स्मार्ट सखींनी ‘लोकमत’च्या माध्यमातून गुरुवारी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. यानंतर मनपाच्या सफाई अधीक्षकांनी गुरुवारी मधला मारुती परिसरातील १२ बेशिस्त फूलविक्रेत्यांना १८०० रुपयांचा दंड ठोठावला. पुढील काळात रस्त्यावर कचरा टाकणे न थांबल्यास गुन्हे दाखल होतील, असा इशाराही देण्यात आला. दरम्यान, पुढील काळात हॉटेल्सवर बारकाईने लक्ष ठेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
सोलापुरातील स्मार्ट महिलांच्या पुढाकारातून ‘लोकमत’ सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया नागरिकांची पोलखोल करीत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरातील अनेक स्मार्ट महिला रस्त्यावर कचरा टाकणाºया बेशिस्त लोकांचे फोटो पाठवित आहेत. हे फोटो महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे पाठविले जात आहे. मनपा अधिकारी अशा बेशिस्त लोकांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. मधला मारुती परिसरात दिवसातून दोन वेळा घंटागाड्या फिरतात. तरीही येथील फूलविक्रेते रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे स्मार्ट सखींनी दाखवून दिले.
यानंतर मनपाचे आरोग्य निरीक्षक राजशेखर वनारोटे, जयकुमार कांबळे यांनी पटेल फ्लॉवर स्टॉल, चंदन लोखंडे, शकील चौधरी, महाराष्ट्र फ्लॉवर स्टॉल, मल्लिनाथ फ्लॉवर स्टॉल, सिरीन फ्लॉवर स्टॉल, अप्सरा फ्लॉवर स्टॉल, शंकर फुलारी, बी. आर. क्षीरसागर, तिरंगा फ्लॉवर स्टॉल, बंटी क्षीरसागर, वसीम खलिफ यांना एकूण १८०० रुपयांचा दंड ठोठावला. या भागातील इतर दुकानदारांवर कारवाई होणार असल्याचे घनकचरा विभागातील अधिकाºयांनी सांगितले.
आपल्या भागात कचरा होऊ नये, ही प्रत्येक दुकानदार, व्यापाºयाची जबाबदारी आहे. एखादा दुकानदार घंटागाडीत कचरा टाकत नसेल तर परिसरातील इतर दुकानदारांनी त्याला समजावून सांगायचे आहे. ऐकत नसेल तर महापालिकेच्या विभागीय कार्यालयाकडे तक्रार करावी. त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल. पण याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले तर सर्वांना दंड भरावा लागेल, असा इशारा महापालिका उप आयुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिला.
रात्री १० नंतर बाहेर पडा, कारवाई करा
- शहराच्या बहुतांश भागात नियमितपणे घंटागाड्या येत आहेत. झोपडपट्ट्या, अपार्टमेंट्समधील बहुतांश लोक या घंटागाड्यांमध्येच कचरा टाकत आहेत. दुसरीकडे अनेक हॉटेलमधील कचरा रस्त्यावर टाकला जात असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना बुधवारी रात्री ही गोष्ट लक्षात आली. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाºयांनी रात्री १० नंतर शहरात फेरफटका मारावा आणि बेशिस्त हॉटेलचालकांवर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सांगितले.
फेरीवाल्यांनी डस्टबीन ठेवणे बंधनकारक
- शहरातील फेरीवाल्यांनी गाडीसोबत दोन डस्टबीन ठेवणे बंधनकारक आहे. आपल्या गाडीतील कचरा त्या डस्टबीनमध्ये संकलित करून तो घंटागाडीत टाकला पाहिजे. सफाई अधीक्षकांना या फेरीवाल्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. अचानक कारवाई झाली आणि फेरीवाल्याकडे डस्टबीन नसेल तर त्याची गाडी जप्त करण्यात येईल. चायनीज गाडीवाले आणि हॉटेलचालकांनी शिस्त लावून घ्यायला हवी, असे उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.