लोकमत स्टिंग; बीडीओंच्या गैरहजेरीत माढा पंचायत समितीमधील अनेक जण आॅन ड्यूटी घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:45 PM2018-12-01T12:45:57+5:302018-12-01T12:47:43+5:30
लक्ष्मण कांबळे लऊळ : दिवस शुक्रवार, वेळ सकाळी ११:४५ची. माढा पंचायत समितीत सोमवार व गुरुवार वगळता नेहमीप्रमाणे अधिकारी व ...
लक्ष्मण कांबळे
लऊळ : दिवस शुक्रवार, वेळ सकाळी ११:४५ची. माढा पंचायत समितीत सोमवार व गुरुवार वगळता नेहमीप्रमाणे अधिकारी व कर्मचाºयांचा शुकशुकाट. अपवाद वगळता बहुतेक कर्मचाºयांच्या आणि विभाग प्रमुखांच्या खुर्च्या रिकाम्या. साहेब लोकांचे काम कसे निवांऽऽत चाललेले... अन् खेड्यापाड्यातून आलेले ग्रामस्थ पंचायत समितीच्या इमारतीसमोरील झाडांखाली साहेबांच्या प्रतीक्षेत विसावा घेत बसलेले!
या कार्यालयात सुमारे ११:४५ वाजता प्रस्तुत प्रतिनिधीने प्रवेश केला असता सहायक प्रशासन अधिकारी सयाजी बागल आपल्या आस्थापनेच्या कक्षात कामकाजात व्यस्त दिसले. त्यांच्या विभागातील सर्वच कर्मचारी वेळेवर आल्याचे दिसून आले. येथून कनिष्ठ प्रशासन अधिकारी रमेश बोराडे व आरपीआयचे जिल्हा संघटन सचिव चंद्रकांत वाघमारे यांना सोबत घेत सर्व विभागाची पाहणी केली. त्यावेळी १२:२३ वाजले होते. गटशिक्षण अधिकारी कार्यालयात स्वत: गटशिक्षण अधिकारी विष्णू कांबळे व तीन विस्तार अधिकारी चांगदेव कांबळे, बंडू शिंदे व सुहास गुरव वगळता वरिष्ठ सहायक एस. एन. कुंभार, आर. आर. झांबरे, विशाल घोगरे, परिचर डोळे इतकेच कर्मचारी उपस्थित दिसले.
पाणीपुरवठा विभागाच्या पाहणीत उपअभियंता जी. एस. शेख व प्रशांत घोडके वगळता इतर शाखा अभियंता अजित वाघमारे, प्रसाद काटकर, एस. के. शेख, पप्पू काशिद, राठोड, दया वाघमारे आदी कर्मचारी उपस्थित दिसले.
१२:३० वाजण्याच्या सुमारास पशुसंवर्धन विभागातील पाहणी केली. येथे नेहमीप्रमाणे पशुधन पर्यवेक्षक आर. वाय. थिटे, लिपिक विकास माने, यादव मॅडम, परिचर माणिक थोरात वगळता कोणीही दिसून आले नाही. पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कैलास कच्छवे, व्ही. जे. नेमाणे, ए. एम. सोनावणे आदी नेहमीप्रमाणे यावेळीही गैरहजरच दिसले.
यानंतर १२:४५ वाजता आरोग्य विभागात पाहणी केली असता कनिष्ठ सहायक बी. व्ही. चव्हाण, एच. ए. जाधव, ए. ए. देवधरे, एम. पी. डब्लू. एच. ए. होनराव, एस. बी. बस्के व टीम, शिपाई यु. बी. माळी वगळता कोणीही दिसून आले नाही. रुबेला लसीकरण सुरू असल्याने हे कर्मचारी दौºयात असल्याचे सांगण्यात आले.
१२:५१ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागात पाहणीत शाखा अभियंता हनुमंत निकम, कनिष्ठ सहायक महेश शेंडे, रेखा जाधवर व शिपाई कुलकर्णी वगळता कुठलाही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता. उपअभियंता खरात कधीतरी इकडे येतात, ही बाब समोर आली. त्यानंतर लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातही उपअभियंता पी. बी. भोसले, साठे, घाणेगावकर, सय्यद हे शाखा अभियंता गैरहजर दिसले. वरिष्ठ सहायक एम. एम. बुधतराव, डी. एच. कुलकर्णी व परिचर एस. एस. शेख आपल्या कामात व्यस्त दिसले. १:१० वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत विभागात विस्तार अधिकारी पी. आर. लोंढे, ए. ए. कानडे, बी. एस. झालटे, परिचर सय्यद वगळता कोणीही आढळून आले नाहीत. अन्य कर्मचारी दौºयावर असल्याचे सांगण्यात आले. अर्थ विभागात सहायक लेखा अधिकारी ए. जी. मानेंसह सर्व उपस्थित होते. कृषी विभागात विस्तार अधिकारी देवा सारंगकर हे एकटेच दिसून आले. नंतर कृषी अधिकारी संभाजी पवार व ठावरे पोहोचले. तोपर्यंत २ वाजले होते. बीडीओ, सभापती, उपसभापती यांच्यासह अनेक विभाग प्रमुखांच्या कक्षाला तर सकाळपासूनच कुलूप असल्याचे सांगण्यात आले.
पावणेबारा ते अडीच या वेळेत केली पाहणी
- लोकमतच्या प्रस्तुत प्रतिनिधीने शुक्रवारी सकाळी ११:४५ ते २:३० वाजण्याच्या सुमारास पंचायत समितीच्या सर्व विभागांचे स्टिंग अॉपरेशन केले. त्यावेळी हे चित्र दिसून आले. माढ्याच्या बीडीओसह सर्वच विभागाच्या प्रमुखांची कार्यालयात दांडी दिसली. साहेबच गैरहजर असल्याचे पाहून इतर अधिकारी व कर्मचाºयांनीही आॅन ड्यूटी गैरहजेरी लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जिल्हा परिषद अध्यक्ष असलेल्या संजय शिंदे व त्यांचे पुतणे विक्रमसिंह शिंदे हे सभापती असलेल्या माढा पंचायत समितीत, असा धक्कादायक प्रकार नेहमीच असतो हे सुद्धा यानिमित्ताने समोर आले. त्यामुळे या दांडीबहाद्दरांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बायोमॅट्रिक मशीन नावालाच !
- - माढा पंचायत समितीचा कारभार दररोज असाच निवांत चालत असल्याची धक्कादायक माहिती यावेळी समोर आली.
- - प्रमुख अधिकारी हजर नसल्याने व त्यावर पदाधिकाºयांचा अंकुश नसल्यानेच येथे अशी स्थिती आहे.
- - येथील इमारत जिल्ह्यात क्रमांक एकची म्हणून गणली जाते. सुमारे ५ कोटी रुपये खर्चून हे बांधकाम झाले. इमारत सुंदर झाली, मात्र व्यवस्था तशीच आहे.
- - तालुक्यातून दूरवरून येणाºया सर्वसामान्यांना न्याय मिळावा, ही नागरिकांची माफक अपेक्षा आहे. येथील बायोमॅट्रिक नुसते नावालाच आहे.
- - सकाळी एकदा थंब झाला की कर्मचारी दिवसभर खासगी कामे करीत फिरायला मोकळे असतात. अशा कर्मचाºयांवर काय कारवाई होणार, हे आता महत्त्वाचे आहे.
- - याबाबत माढ्याचे बीडीओ महेश सुळे यांच्या प्रतिक्रियेसाठी भ्रणध्वनीवरून संपर्क साधला, मात्र तो बंद असल्याचे दिसून आले.