सोळा दुचाकींवरुन फिरत क्षय रुग्णांवर नजर; आरोग्य विभागाकडे ७७ ॲम्ब्युलन्सचा ताफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 12:46 PM2020-12-25T12:46:15+5:302020-12-25T12:46:20+5:30
सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे चालविली जातात
राजकुमार सारोळे
सोलापूर : जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी ७७ ॲम्बुलन्स तर टीबीच्या रुग्णांना खास सेवा देण्यासाठी १६ मोटरसायकलींचा वापर केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे चालविली जातात. प्रत्येक केंद्रात एक ॲम्बुलन्स आहे. गरोदर महिलांची ने -आण व अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना सेवा दिली जाते. त्याचबरोबर जिल्हा मुख्यालयातून औषध आणण्यासाठी या चार चाकी वापरल्या जातात. शासनाने ही वाहने खरेदी करून दिली आहेत. या वाहनांना १२ ते १५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे जुनी वाहने बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. गरोदर महिलांना वेळेत उपचारास नेण्यास ही सेवा उपयुक्त आहे.
चारचाकी ॲम्ब्युलन्सबराेबर क्षयरोग विभागाला १६ मोटरसायकली दिलेल्या आहेत. अकरा तालुक्यात प्रत्येकी एक पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आला आहे. हा पर्यवेक्षक तालुक्यातील रुग्णांना औषधोपचार व तपासणीचा फाॅलोअप घेतो. रुग्णाकडे ये जा करण्यासाठी आरोग्य विभागाने पर्यवेक्षकाला खास मोटरसायकल दिली आहे. याचबरोबर सोलापूर शहरात पाच पर्यवेक्षक काम करतात. या मोटरसायकली खरेदी करून बरेच दिवस झाले आहेत. त्यामुळे आता नव्याने आठ मोटरसायकली घेण्यात येत आहेत. क्षयरोगाबरोबर कुष्ठरोग असणाऱ्यांना सेवा देण्याचे काम केले जाते.
दुचाकीच्या माध्यमातून केली जाणारी कामे
- - कुष्ठरोग विभागाकडे असलेल्या मोटरसायकली पर्यवेक्षकांना दिलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यास एक प्रमाणे ११ पर्यवेक्षक आहेत.
- - शहरात पाच पर्यवेक्षक आहेत. ते रुग्णांना भेटी देऊन औषधोपचार करतात. रुग्णांच्या स्थितीबाबत वरिष्ठांना अहवाल कळवितात.
चारचाकीतून केली जाणारी कामे
- - गरोदर महिलेस घरून आणले जाते व बाळंतपणानंतर पुन्हा घरपोच सेवा दिली जाते.
- - प्राथिमक आरोग्य केंद्रात दाखल अत्यवस्थ रुग्णास सिव्हिल हॉस्पीटलकडे हलविण्यासाठी ही सेवा उपयोगी ठरते.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या ॲम्ब्युलन्स गरोदर महिलांना सेवा देण्यासाठी उपयोगी पडतात. दुचाकी क्षयरोग विभागाकडे आहेत. कुष्ठरोग व आरोग्य केंद्राच्या सेवेसाठी अशा वाहनांची गरज आहे, त्याबाबत प्रस्ताव देणार आहोत.
- डॉ. शीतलकुमार जाघव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.