लांबोटी शिवारातील पेट्रोल पंपावर साडेचार लाख रुपये लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:16 PM2018-03-13T13:16:29+5:302018-03-13T13:16:29+5:30
शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी केला प्रकार, चोरट्यांच्या तपासासाठी पथके स्थापन केले असून, ती रवाना करण्यात आल्याचे ग्रामीण पोलीसांनी सांगितले़
मोहोळ : लांबोटी शिवारातील जोशाबा पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकासह चौघांना चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी दोन मोबाईल आणि साडेचार लाखांची रोकड लुटली.
पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक सोहेल शेख यांच्यासह सोमनाथ विश्वनाथ अवशेट्टी, गणेश शिवपुरे हे कर्मचारी रात्रपाळीच्या ड्यूटीवर होते. सोमवारी पहाटे एक ते दीडच्या सुमारास पांढºया रंगाची इंडिका कार पेट्रोल पंपावर आली. त्यातून एक चोरटा उतरून पंपाच्या कार्यालयात आला. ‘मी जेवण करण्यासाठी थांबणार आहे’ असे सांगून तो तेथून निघून गेला.
पहाटे दोन वाजता पंपावरील वीज गेली. वीज का गेली म्हणून सोमनाथ हे उठून बाहेर आले असता दोघे हातात कोयता आणि तलवार घेऊन त्याच्याजवळ गेले. कॅश कोठे आहे? अशी विचारणा करीत धमकी दिली. चोरट्यांच्या या प्रकाराला घाबरून सोमनाथने आपल्या खिशातील रोकड काढून दिली. आणखी कॅश कोठे आहे, असे विचारत त्याने व्यवस्थापकाच्या रूममध्ये असल्याचे सांगितले. पंपावरील चौघांना पंपाच्या कार्यालयात नेले. मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देऊन कॅशबॉक्स आणि कपाटातील रक्कम आणि त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेतले.
चौघांपैकी एका चोरट्याने सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन डिस्प्ले स्क्रीन काढून घेतले. व्यवस्थापकासह सोमनाथ व गणेश यांना लॉकर असलेल्या खोलीत बंद करून बाहेरून कडी लावून चोरट्यांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजू राठोड करीत आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे, मोहोळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पोलीस अधीक्षक प्रभू यांनी तपासाचे आदेश दिले.
ग्राहकाने काढले तिघांना बाहेर
- सोमवारी पहाटे साडेपाच वाजता पेट्रोल भरण्यासाठी तो पंपावर आला. त्याने जोराने हॉर्न वाजवत असताना तिघांनी आतून आरडाओरडा केला. त्यानंतर त्या ग्राहकाने दरवाजा उघडून तिघांना बाहेर काढले.