व्यवस्थापकानेच लुटली बँकेची ७० लाखांची रोकड, पंढरपूर लूटमार प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:07 AM2017-11-03T01:07:21+5:302017-11-03T01:07:46+5:30
बँक आॅफ महाराष्ट्राची ७० लाख रुपयांची रक्कम लुटून नेल्याप्रकरणी फिर्यादी आणि बँक व्यवस्थापक अमोल भोसले याच्यासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
सोलापूर : बँक आॅफ महाराष्ट्राची ७० लाख रुपयांची रक्कम लुटून नेल्याप्रकरणी फिर्यादी आणि बँक व्यवस्थापक अमोल भोसले याच्यासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
बँक आॅफ महाराष्टÑच्या सांगोला शाखेतून पंढरपूर शाखेत भरणा करण्यासाठी ७० लाख रुपयांची रक्कम व्यवस्थापक भोसले याच्या गाडीतून आणली जात होती. बुधवारी दुपारी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे ही रक्कम लुटण्यात आली. या गुन्ह्यात तपासामध्ये बँक व्यवस्थापक तथा फिर्यादी अमोल भोसले याची कसून चौकशी केली असता, त्याने भाऊसाहेब कोंडिबा कोळेकर (रा. गोणेवाडी.ता. मंगळवेढा) याच्यासोबत कट रचून ही लूट केल्याचे कबूल केले.
पोलिसांनी बँक व्यवस्थापक व भाऊसाहेब कोळेकर या दोघांना अटक केली असून कोळेकर याच्याकडून ३१ लाख रुपयांची रोकड हस्तगत केल्याचे पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सांगितले. सरपंच रामेश्वर मासाळ, नवनाथ मासाळ, बंडू मासाळ, श्ांकेश्वर मासाळ या चौघांची नावे संशयित म्हणून नावे पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.