भाजपाबरोबर युती न केल्यास शिवसेनेचे नुकसान : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:35 PM2018-06-04T12:35:41+5:302018-06-04T12:35:41+5:30
सोलापूर : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना यांची जुनी मैत्री आहे़ त्यामुळे त्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढवाव्यात़ युती करण्यासाठी भाजप तयार आहे, मात्र जर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढविली तर भाजपपेक्षा त्यांचेच जास्त नुकसान होणार आहे़ युतीबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे़ उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्याविषयी त्यांना सांगितले आहे़ सत्तेतील हे दोन पक्ष विभक्त झाल्यास राज्याचेही मोठे नुकसान होणार आहे़ काहीही झाले तरी आरपीआय मात्र भाजपसोबत राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले़
पंढरपूर दौºयावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी आरपीआयचे नेते राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, कीर्तीपाल सर्वगोड, आबासाहेब दैठणकर, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, महादेव भालेराव, अशोक सरवदे, आतिश हाडमोडे, रामभाऊ गायकवाड, दीपक चंदनशिवे, अर्जुन मागाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़
कर्नाटक राज्यातील निवडणुकीनंतर कुमारस्वामी यांच्या शपथविधीला देशातील भाजपविरोधी सर्व पक्षांचे प्रमुख एकत्र आले़ त्यानंतर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका भाजपविरोधी पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करून लढण्याची चर्चा सुरू झाली, मात्र ही तिसरी आघाडी अपयशी ठरेल, कारण त्या-त्या राज्यात स्थानिक पक्षांमध्ये मतभेद आहेत़ ते कदापी एकत्र येऊ शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले़
रामदास आठवले म्हणाले, तिसºया आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा़ शरद पवार यांच्याकडे दिले आहे, मात्र यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष खा़ राहुल गांधी हे मागे पडतील़ शिवाय अनेक राज्यांतील स्थानिक पक्षांमध्ये मतभेद आहेत़ त्यामुळे भाजप विरोधातील तिसरी आघाडी अपयशी ठरेल़
नंदूरबार येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी संविधानाविरोधात वक्तव्य केले आहे़ त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, असे सांगून जातनिहाय जनगणनेविषयी बोलताना रामदास आठवले म्हणाले, केवळ ओबीसीची जनगणना नको तर देशातील जेवढ्या जाती आहेत, त्या सर्व जातींची जातनिहाय जनगणना व्हावी, म्हणजे कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे कळेल़ एस़ सी़, एस़ टी़ आणि ओबीसी यांचे आरक्षण वगळून आरक्षणासाठी जो समाज आंदोलन करीत आहे, त्यांना आरक्षण द्यावे़ देशात दिव्यांगांसाठी ७ हजार ठिकाणी शिबीर घेऊन ९ लाखांपेक्षा जास्त दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत साहित्य दिले आहे़