यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता सोलापूर जिल्ह्याला पुराची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 04:15 PM2021-06-08T16:15:24+5:302021-06-08T16:15:29+5:30

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज - आराखडा तयार, धोकादायक इमारतींना दिल्या नोटिसा

A lot of rain this year; Flood threat to Solapur district after Corona | यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता सोलापूर जिल्ह्याला पुराची धास्ती!

यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता सोलापूर जिल्ह्याला पुराची धास्ती!

Next

सोलापूर : कोरोनाचे संकट संपत नाही तोपर्यंत आता भरपूर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे भीमा, सीना नदीकाठच्या लोकांना कोरोनानंतर आता पुराची धास्ती लागली आहे. पुराच्या शक्यतेने आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.

मागील दोन वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील लोकांना कोरोना, पूर, अतिवृष्टी, अवकाळी पावसाचा तडाखा अशा एक ना अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराने अनेकांचा जीव गेला, अतिवृष्टीत अनेकांचे संसार वाहून गेले, तर अवकाळी पावसाने अनेकांची शेती भुईसपाट झाली. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य व्यक्ती मोठ्या प्रमाणात खचला आहे. यंदा भरपूर पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला अन् पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करावे, यासंदर्भात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पूरजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी सज्ज ठेवल्या आहेत. अधिकचे साहित्य मिळण्यासाठी २ कोटींचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे.

 

प्रशासनाची तयारी...

  • फायबर बोटी - ०२
  • लाईफ जॅकेट - १० ते १२
  • रेस्क्यू व्हॅन - ००
  • कटर - ००

अग्निशामक दल सज्ज

जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याकाळात मदत करणारी अग्निशामक दलाची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, माढा, माळशिरस आदी नगरपालिका प्रशासनाची अग्निशामक दलाच्या गाड्या व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे शिवाय गरज पडली तर सोलापूर महापालिकेच्याही अग्निशामक दलाची मदत घेण्यात येणार आहे शिवाय जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे असलेल्या अग्निशामक दलाचीही मदत घेण्यात येणार आहे.

पूरबाधित क्षेत्र...

जिल्ह्यात भीमा व सीना नदीकाठचा परिसर पूरबाधित क्षेत्र आहे. त्यात पंढरपूर, माढा, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण साेलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, अक्कलकाेट तालुक्यांतील बराच भाग येतो. या भागात पूरजन्य परिस्थिती येण्याची शक्यता पाहून शेतकऱ्यांना जनावरे नदीकाठापासून लांब बांधण्याच्या सूचना केल्या आहेत, शिवाय वीज कोसळून जनावरे मृत्युमुखी पडू नये यासाठी झाडापासून लांब अंतरावर जनावरे बांधण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.

जिल्ह्यातील धोकादायक इमारतींना नोटिसा

जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्र परिसरात असलेल्या धोकादायक इमारतींना संबंधित तहसील प्रशासनाकडून नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत; शिवाय पंढरपूर, माळशिरस व अन्य तालुक्यातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू आहे, लवकरच त्यांनाही नोटिसा बजाविण्यात येणार आहेत. शिवाय ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाहीसाठी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांच्याशीही संवाद साधण्यात येत आहे.

यंदा पाऊस भरपूर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज ठेवण्यात आला आहे. आवश्यक त्या गोष्टी, यंत्रसामग्री, साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे. अन्य जास्त साहित्य मिळविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पूरबाधित क्षेत्रातील लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- चंद्रकांत हेडगिरे,  प्रभारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सोलापूर

Web Title: A lot of rain this year; Flood threat to Solapur district after Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.