चिठ्ठ्या, कपडे अन् दोघा साथीदारांना पकडण्यासाठी मागितली पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:51+5:302021-09-21T04:24:51+5:30
करमाळा : महिलेवर सामुदायिक अत्याचार व फसवणूक प्रकरणी उंदरगाव येथील भोंदूबाबा मनोहरमामा भोसले याला सोमवारी करमाळा न्यायालयासमोर ...
करमाळा : महिलेवर सामुदायिक अत्याचार व फसवणूक प्रकरणी उंदरगाव येथील भोंदूबाबा मनोहरमामा भोसले याला सोमवारी करमाळा न्यायालयासमोर हजर केले. त्याच्याकडून महिलेवरील अत्याचार प्रकरणात चिठ्ठ्या, कपडे जप्त करण्यासाठी आणि त्याच्या फरार दोन साथीदारांना पकडण्यासाठी करमाळा पोलिसांनी आणि सरकारी वकिलांनी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली. युक्तिवादाअंती न्यायदंडाधिकाऱ्यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
रविवारी दुपारी करमाळा पोलिसांनी मनोहरमामाला बारामती पोलिसांकडून स्वत:च्या ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी सोमवार, २० सप्टेंबर रोजी त्यास करमाळा न्यायालयात हजर केले. आरोपी व सरकार पक्षाचा आरोपी व सरकार पक्षाचा न्यायालयात तब्बल पाऊणतास युक्तिवाद चालला.
मनोहरमामा भोसलेवर बारामती व करमाळा पोलिसात गुरुवार, ९ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी दोन गुन्हे दाखल झाले. फसवणूक प्रकरणात बारामती न्यायालयाने भोसलेला दोनवेळा पोलीस कोठडी दिली. ती संपल्यानंतर रविवारी त्याला न्यायालयात हजर केले तेव्हा पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मागितली.
करमाळ्यातील गुन्ह्यात पीडितेवर सामुदायिक अत्याचारप्रकरणी मनोहरमामा भोसले याचे दोन साथीदार विशाल वाघमारे ऊर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे या दोघांना ताब्यात घ्यायचे असल्याचा मुद्दा मांडला. तपासा कामी त्याला ताब्यात देण्याची मागणी करमाळा पोलिसांनी बारामती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने रविवारी मनोहरमामाला करमाळा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी ताब्यात घेऊन करमाळ्यात आणून अटक केली. सोमवारी दुपारी भोसलेला न्यायालयात आणले तेंव्हा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला.
सरकार पक्षातर्फे ॲड. सचिन लुणावत यांनी काम पाहिले.
----
मनोहरमामाच्या वकिलांनी मागितली न्यायालयीन कोठडी
पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व त्यांच्या पथकाने दुपारी पावणे एक वाजता त्यास करमाळा न्यायालयात आणले. एका मालिकेत काम देतो, असे सांगत पीडितेवर अत्याचार केल्याचा भोसलेवर आरोप आहे. या गुन्ह्यातील कपडे जप्त करणे, चिठ्ठी जप्त करणे अशा १७ कारणांचा तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी तपास अधिकारी कोकणे यांनी मागितली. ॲड. लुणावत यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली. दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा तपास करायचा असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. दरम्यान, भोसलेच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडी मागितली.
------
न्यायालयाने विचारले पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का ?
सोमवारी दुपारी एक वाजता मनोहर भोसले यास न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायाधीशांनी भोसलेला पोलिसांविरुद्ध काही तक्रार आहे का ? असा प्रश्न केला. त्यावर मनोहरमामाने काही तक्रार नाही, असे सांगितले. त्यानंतर तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी महिलेवरील अत्याचार प्रकरणात मनोहरमामाकडून चिठ्ठ्या, कपडे ताब्यात घ्यावयाचे असल्याचे सांगत नाथबाबा ऊर्फ विशाल वाघमारे व वैभव वाघ हे या दोन फरार आरोपींना पकडण्यासह विविध १७ कारणांसाठी १० दिवस पोलीस कोठडी मागितली. त्याअनुषंगाने शासकीय अभियोक्ता ॲड.सचिन लुणावत यांनीही आरोपीस तपासाकामी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली. त्यानंतर भोसलेच्या बाजूने ॲड.रोहित गायकवाड व ॲड. हेमंत नरुटे या दोघांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी आरोपी विरुद्ध दाखल फिर्याद ही संदिग्ध आहे, बनावट असून पैशाचा संदर्भ जोडलेल्या ठिकाणी कोणत्याही बँकेचा संदर्भ अथवा अधिकृत कागदपत्रे नाहीत. तसेच पीडित महिला सातारा जिल्ह्यातून पाच वेळा भोसले यांच्या मठात येत होती. अत्याचार होत राहिला तर ती पुन्हा पुन्हा कशी आली. उंदरगाववरून जाताना बारामती पोलीस स्थानक लागते, मग घटना घडल्या घडल्या तिने फिर्याद का दिली नाही. याचाच अर्थ केवळ आरोपीला बदनाम करण्यासाठी खोटी फिर्याद दिल्याचा युक्तिवाद मनोहरमामाच्या वकिलांनी केला. यावर न्यायाधीश शिवरात्री यांनी यातील आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
-----
फोटो : २० करमाळा
करमाळा न्यायालयात मनोहरमामाला आणताना पोलीस बंदोबस्त.