वडकबाळ सोसायटीच्या ठरावाची लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:57+5:302021-08-22T04:26:57+5:30
पंच कमिटीच्या बहुमताने फुटण्याची शक्यता सोलापूर : वडकबाळ विकास सोसायटीचा ठराव आपल्याच नावे करावा यासाठी आप्पासाहेब पाटील- वडकबाळकर आणि ...
पंच कमिटीच्या बहुमताने फुटण्याची शक्यता
सोलापूर : वडकबाळ विकास सोसायटीचा ठराव आपल्याच नावे करावा यासाठी आप्पासाहेब पाटील- वडकबाळकर आणि इंदुमती आलगोंड-पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. सोसायटीच्या पंच कमिटीत यावरून दोन गट पडले आहेत. पेचात पडलेली पंच कमिटी बहुमताने त्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आप्पासाहेब पाटील-वडकबाळकर इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी वडकबाळ सोसायटीचे प्रतिनिधित्व केले होते. ही सोसायटी थकीत असल्याने उमेदवारी अर्ज अवैध ठरण्याच्या भीतीने त्यांनी सभासदांची ५२ लाख रुपये थकीत रक्कम भरून सोसायटीची शंभर टक्के कर्ज वसुली दर्शवली होती. आता पुन्हा याच सोसायटीतून आपला ठराव द्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
याच सोसायटीतून इंदुमती अलगोंड-पाटील यासुद्धा आपल्या नावाचा ठराव घेण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे उभयतांत रस्सीखेच सुरू आहे. आप्पासाहेब पाटील आणि इंदुमती अलगोंड हे दोघे निकटचे नातलग आहेत. दोघेही बाजार समितीचे संचालक आहेत. आपल्याच नावाचा ठराव व्हावा यासाठी दोघेही आग्रही आहेत. सोसायटीच्या पंच कमिटीत या मु्द्द्यावरून दोन गट पडले आहेत. उभयतांत तडजोड घडवून आणण्याचे नातलगांसह हितचिंतकांचे प्रयत्न फोल ठरले. त्यामुळे सोसायटीच्या पंच कमिटीत मतदान घेण्याचा पर्याय पुढे आला आहे.
-------
...तर सव्वा कोटी भरावे लागतील
वडकबाळ सोसायटीचे प्रतिनिधित्व करताना सभासदांची ५२ लाखांची थकबाकी आप्पासाहेब पाटील यांनी मागील निवडणुकीवेळी भरली होती. ही सोसायटी आताही थकीत असल्याने उमेदवारी अर्ज वैध ठरण्यासाठी सभासदांच्या कर्जाचे तब्बल सव्वा कोटी रुपये जमा करणे क्रमप्राप्त आहे. यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
----